कर्नाटकचा 383 धावांचा यशस्वी पाठलाग
मुंबईचा लाजिरवाणा पराभव : श्रीजीतच्या दीडशतकी खेळीने कर्नाटकचा दणकेबाज विजय
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तब्बल 383 धावांचे लक्ष्य पूर्ण करत कर्नाटकने मुंबईला 7 गड्यांनी पराभूत केले. श्रेयस अय्यरचे शतक, शिवम दुबे, हार्दिक तोमोर व आयुष म्हात्रे यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 50 षटकांत 4 बाद 382 धावा केल्या. यानंतर कर्नाटकने विजयी लक्ष्य 46.2 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. या विजयासह कर्नाटकला चार गुण मिळाले आहेत.
प्रारंभी, विजय हजारे ट्रॉफीला 21 डिसेंबरपासून सुरुवात झाली. क गटात मुंबई व कर्नाटक यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला. कर्नाटकने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीला मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली, सलामीवीर अंगीकृष रघुवंशी 17 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. यानंतर आयुष म्हात्रे व हार्दिक तोमोर यांनी तुफानी फटकेबाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली. आयुषने 82 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 78 धावा फटकावल्या. अर्धशतकानंतर मात्र तो 30 व्या षटकांत बाद झाला. यानंतर हार्दिक तोमोरही 94 चेंडूत 84 धावा काढून माघारी परतला. ही सेट झालेली जोडी बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या चेंडूपासून कर्नाटकच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. श्रेयसने शानदार शतकी खेळी साकारताना अवघ्या 55 चेंडूत 5 चौकार व 10 षटकारासह नाबाद 114 धावा फटकावल्या. त्याला शिवम दुबेने 36 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारासह नाबाद 63 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 114 धावांची भक्कम भागीदारी साकारली. यामुळे मुंबईने 50 षटकांत 4 गडी गमावत 382 धावांचा डोंगर उभा केला.
कर्नाटकचा सहज विजय, श्रीजीतची दीडशतकी खेळी
विजयासाठीच्या 383 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर निकीन जोस 13 चेंडूत 21 धावा करून जुनैद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर मयंक आगवाल आणि केव्ही अनिशने संघाच्या धावसंख्येला आकार दिला. मयंकने 48 चेंडूत 47 धावा केल्या. मयंक आऊट होताच श्रीजीथ क्रीजवर आला. त्याने अनिशसोबत भागीदारी करताना मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अनिश 66 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 82 धावा करून बाद झाला. मात्र श्रीजीतने वादळी फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. श्रीजीतने 101 चेंडूत 20 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 150 धावा केल्या. त्याला प्रवीण दुबेनेही 50 चेंडूत 65 धावा करत चांगली साथ दिली. श्रीजीत व प्रविणच्या वादळी खेळीच्या जोरावर कर्नाटकने विजयी लक्ष्य 46.2 षटकांत पूर्ण करत विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई 50 षटकांत 4 बाद 382 (आयुष म्हात्रे 78, हार्दिक तोमोर 84, श्रेयस अय्यर नाबाद 114, शिवम दुबे नाबाद 63, प्रविण दुबे 2 बळी)
कर्नाटक 46.2 षटकांत 3 बाद 383 (मयांक अगरवाल 47, अनिश 82, श्रीजीथ नाबाद 150, दुबे नाबाद 65, मोहम्मद जुनेद खान दोन बळी).
दणकेबाज विजयासह कर्नाटकची अनोखी कामगिरी
शनिवारी विजय हजारे ट्रॉफीत मुंबईने विजयासाठी दिलेले 383 धावांचे लक्ष्य कर्नाटकने यशस्वीरित्या पूर्ण करताना अवघ्या 46 षटकांतच विजय मिळवला. यासह या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करणार कर्नाटक हा दुसरा संघ ठरला. याआधी 2012 मध्ये आंध्र प्रदेशने 384 धावांचा यशस्वी पाठलाग करताना गोवा संघाला पराभूत केले होते.
विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक यशस्वी पाठलाग
- आंध्र प्रदेश 384 धावा वि गोवा, 2012
- कर्नाटक 383 धावा वि मुंबई, 2024
- मुंबई 358 धावा वि बडोदा, 2008
- झारखंड 356 धावा वि महाराष्ट्र 2023.
महाराष्ट्राचा विजयारंभ, राजस्थानवर मात
मुंबई : विजय हजारे ट्रॉफीतील ब गटातील सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानवर तीन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कार्तिक शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने 215 धावा केल्या. यानंतर महाराष्ट्राने विजयीसाठीचे आव्हान 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. अंकित बावणेने सर्वाधिक नाबाद 74 धावांचे योगदान दिले. या विजयासह महाराष्ट्राला 4 गुण मिळाले आहेत.
पंजाबने वनडे सामना 12 षटकांत जिंकला, अनमोलप्रीतचे 35 चेंडूत शतक
अहमदाबाद : विजय हजारे ट्रॉफीत पंजाबकडून खेळणाऱ्या 26 वर्षीय अनमोलप्रीत सिंग याने इतिहास रचला आहे. त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावून लिस्ट ए च्या इतिहासातील तिसरे जलद शतक ठोकले.
प्रारंभी, अरुणाचल संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.4 षटकात 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने अवघ्या 12.5 षटकांत 1 गडी गमावून सामना जिंकला. पंजाबकडून कर्णधार अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग सलामीला आले. अभिषेक 10 धावा करून बाद झाला. तर प्रभासिमरनने 35 धावा केल्या. तर अनमोलप्रीतने शतक झळकावले. त्याने अरुणाचलच्या गोलंदाजांची धुलाई करताना अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावले. तर 45 चेंडूत 12 चौकार व 9 षटकारासह 115 धावांची वादळी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या खेळीसह अनमोलप्रीत लिस्ट ए मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय ठरला आहे. यावेळी त्याने युसूफ पठाणचा विक्रम मोडला. युसूफने 40 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. याशिवाय, अनमोलप्रीत आंतरराष्ट्रीय पातळीवर लिस्ट ए स्पर्धेत सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिस्रया क्रमांकावर आला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम 22 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाज जेक फ्रेजर मॅकगर्कच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 29 चेंडूत शतक झळकावले होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर लिस्ट ए मध्ये चेंडूच्या बाबतीत सर्वात जलद शतक
- 29 चेंडू - जेक फ्रेझर-मॅकगर्क (125 धावा), 2023
- 31 चेंडू - एबी डिव्हिलियर्स (149 धावा), 2015
- 35 चेंडू - अनमोलप्रीत सिंग (115 धावा), 2024
- 36 चेंडू - कोरी अँडरसन (131 धावा), 2014