काणकोणात सतर्कतेमुळे मोठा दरोडा फसला
गस्तीवरील पोलिस, वेर्णेकरांची सतर्कता यशस्वी चोरांचे पोलिसांवर दगडफेक करून पलायन
काणकोण : बायणा, वास्को येथील घरफोडींची प्रकरणे ताजे असतानाच 25 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीचच्या दरम्यान चावडी, काणकोण येथील प्रवीण वेर्णेकर यांच्या मालकीच्या एस. एम. ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गस्तीवर असलेल्या काणकोण पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांच्या हाताला काहीच लागू शकले नाही. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर जवळच्या शेतातून पळून गेले. काणकोणच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र त्यांना ते सापडू शकले नाहीत. चोरीच्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये साधारणपणे आठजण होते, अशी माहिती वेर्णेकर आणि काणकोणच्या पोलिसांनी दिली. चावडी, काणकोण येथील काणकोण पालिकेच्या नवीन इमारतीच्या शेजारी प्रवीण वेर्णेकर यांचे सोन्याचे दुकान असून शेजारीच त्यांचे राहते घर आहे.
दोन पोलिसा धावले घटनास्थळी
कसला तरी आवाज येत असल्याचे कानी पडताच वेर्णेकर यांनी काणकोणच्या पोलिसांशी संपर्क साधला असता गस्तीवर असलेले जगदीश गावकर आणि यशवंत देसाई हे दोन पोलिस कर्मचारी घटनास्थळी धावून आले. त्यांनीच वेर्णेकर यांच्या घरच्या दरवाजाला बांधलेला दोरखंड मोकळे केला. यावेळी चोरांना त्यांची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांवर दगडांचा वर्षाव केला आणि समोरच्या शेतातून पळ काढला.
काणकोण पोलिसांची शोधाशोध
गस्तीवर असलेल्या अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर लगेच काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिश रा. देसाई यांना याची कल्पना दिली. स्वत: निरीक्षक देसाई, अन्य दोन उपनिरीक्षक अणि अन्य पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली. पोळे चेकनाका आणि अन्यत्र नाकाबंदी करण्यात आली. ऐनवेळी जर गस्तीवरील पोलिस धावून आले नसते, तर कोट्यावधी रुपयांचे दागिने चोरीला गेले असते. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी हे धाडस दाखविले त्यांचे काणकोणच्या जागरुक नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
सकाळी पोलिस श्वानपथकाला पाचारण करून तपासाला वेग देण्यात आला. काणकोणच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे फार मोठ्या दरोड्यातून वेर्णेकर बचावले आहेत. काणकोणच्या पोलिसांनी गस्त वाढवायला हवी. त्याचप्रमाणे काणकोण पालिकेने चावडी, पाळोळे व अन्य प्रमुख भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे एव्हाना बसवायला हवे होते. मात्र आवश्यक आणि जनताभिमुख अशा गोष्टींकडे काणकोण पालिका मंडळ दुर्लक्ष करत असल्याच्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, मंगळवारीदुपारी पर्तगाळी येथे होणाऱ्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या तयारीचा अंतिम आढावा घ्यायला आलेल्या पोलिस प्रमुखांनी काणकोण पोलिस स्थानकावर भेट दिली आणि संपूर्ण अहवाल काणकोणचे निरीक्षक हरिश रा. देसाई यांच्याकडून घेतला. त्यांनी रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची सूचना केली आहे.
असा झाला घटनाक्रम...
- चोरांनीवेर्णेकर यांच्या यांच्या घराचा मुख्य दरवाजा दोरखंडाने बंद केला.
- दुकानव घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर चोरांनी काळा रंग फासला.
- चोरीचाप्रयत्न करण्याअगोदर चोरट्यांनी त्याच ठिकाणी बसून भोजन घेतले.
- त्यानंतरज्वेलरी दुकानाचे शटर वाकविण्यास प्रारंभ केला.
- चोरांचीचाहूल लागताच वेर्णेकर यांनी पोलिसांची संपर्क साधला.
- गस्तीवरीलकाणकोण पोलिस लगेच पोहोचल्याने दरोड टळला.