For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदुरांनी ओळखले की उद्धवाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहे

06:06 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
विदुरांनी ओळखले की उद्धवाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहे
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

सद्गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन करायचे नाही ह्या एकाच विचाराने अत्यंत नाईलाजाने उद्धवाने द्वारकेतून निघायचे ठरवले. निघताना त्याने भगवंतांच्या पायावर स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या चरणांना मिठी मारून ते हृदयाशी धरले. ह्यानंतर भगवंत निजधामाला जाणार असल्याने आता हे चरण पुन्हा दिसणार नाहीत, ह्या कल्पनेने त्याला तेथून निघवेना. तो मनात म्हणाला, मला खरी शांती कृष्णचरणामृती मिळत असल्याने त्या बद्रीकाश्रम नावाच्या महातीर्थाचे मला काहीच महत्त्व वाटत नाही. उलट ते तीर्थ माझ्यासाठी श्रीपतीचा त्याग घडवून आणत आहे. भगवंतांविषयीच्या अत्यंत प्रेमाने आणि त्यांच्या त्यागाच्या कल्पनेने तो चळचळा कापू लागला. त्याचा गळा दाटून आला. अंगभर घाम फुटून शरीर रोमांचित झाले. भगवंतांच्या पाया पडून उद्धव जायला निघत असे पण पुन्हा भगवंतांच्या प्रेमाचा उमाळा दाटून येऊन पुन्हा परत येऊन हरीचे चरण पकडत असे. त्याचे चित्त हरीच्या ठायी गुंतले असल्याने हरीला नमस्कार करून निघणे, पुन्हा परत येऊन लोटांगण घालणे असे वारंवार घडू लागले. उद्धवाचा त्यांच्यावर असलेल्या अतिस्नेह पाहून आणि सद्गुरू म्हणून त्यांच्याठायी असलेली अनन्यत: पाहून भगवंतांना परमानंद झाला. त्याच्याविषयी त्यांना प्रेमाचा उमाळा दाटून आला. कितीही समजावून सांगितले की, माझा आणि तुझ्यात एकच आत्मतत्व असून तू आणि मी एकच आहोत तरी ह्याची समजूत पटण्यासारखी नाही हे त्यांच्या लक्षात आले. ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचा ह्याच्यावर ह्याबाबतीत तरी काहीही परिणाम होणार नाही, अशी त्यांची खात्री झाली. आपला विरह उद्धवाला सहन होणार नाही हे ओळखून त्याला आपल्या पादुका देऊन त्याच्यावर सर्वोच्च कृपा केली पाहिजे असे त्यांना वाटू लागले. जेव्हा सद्गुरू शिक्षण पूर्ण झालेल्या ज्ञानी शिष्याला त्यांना सोडून जाऊन लोककल्याण करायची आज्ञा देतात, त्यावेळी शिष्याला त्यांना सोडून जाताना खूपच वाईट वाटत असते. अशावेळी सद्गुरू त्यांची आठवण म्हणून त्यांच्या पादुका त्याला देतात. त्या पादुकांच्या नित्य पूजनाने शिष्याला सद्गुरू निर्गुण स्वरुपात का होईना आपल्या बरोबर आहेत ह्याची खात्री वाटत असते. भगवंतांनीही हेच करायचे ठरवले. त्यांनी त्यांच्या पादुका उद्धवाला दिल्या. त्या हातात घेताना उद्धवाला परमानंद झाला. जणूकाही आता भगवंत त्या पादुकांच्या रूपाने नित्य आपल्याजवळच असतील अशी त्याला खात्री वाटू लागली. त्याने त्या घेऊन स्वत:च्या डोक्यावर ठेवल्या. पादुका डोक्यावर ठेवताच असा चमत्कार झाला की, आपण आता भगवंतांच्यापासून दूर जात आहोत ही कल्पनाच उद्धवाच्या मनातून नाहीशी झाली. त्याचे मन शांत झाले. श्रीकृष्णनाथांना नमस्कार करून त्यांनी केलेल्या आज्ञेनुसार तो बद्रीकाश्रमात जायला तयार झाला. त्यांना त्याने तीनवेळा प्रदक्षिणा घातली. श्रीकृष्णाचा चेहरा नीट निरखून हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवला. श्रीचरणांना नमस्कार केला आणि सद्गुरूंच्या आज्ञेनुसार उद्धव बद्रीकाश्रमात जायला निघाला. मजल दरमजल करत त्याचा प्रवास सुरु होता. बद्रीकाश्रमाच्या वाटेवर असताना त्याला विदुर भेटले. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. एकमेकांचे कुशल सावचितपणे विचारू लागले. बोलताबोलता विदुरांनी त्याला श्रीकृष्णाचे निधन झाल्याचे सांगितले. खरं म्हणजे विदुरांची अशी अपेक्षा होती की, श्रीकृष्णाचे निधन झाल्याचे ऐकल्यावर उद्धवाला धक्का बसेल, तो धाय मोकलून रडायला लागेल, छाती पिटून घेईल कारण त्याला त्याच्या सद्गुरूंच्या निधनाचे अनिवार दु:ख होईल पण तसं काहीही झालं नाही. उद्धव बिलकुल दीनवदन झाला नाही. अर्थात विदुरही काही कमी नव्हते. त्यांनी उद्धवाची ही चिन्हे बघितल्यावर लगेच ओळखले की, ह्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहे.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.