महामार्गावर ‘खाकी’ची राजरोस वाटमारी!
ट्रकचालकांकडून प्रत्येकी 200 रुपयांची वसुली : व्हिडिओ व्हायरल झाल्याने नाचक्की
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा येथे ट्रक चालकांकडून पैसे वसूल करणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधील अधिकारी व पोलिसांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून व्हिडिओमधील संभाषणावरून महामार्गावर ट्रक चालकांची लूट नित्याचीच सुरू असल्याचे दिसून येते. काही खासगी वाहिन्यांनीही ट्रक चालकांकडून अधिकारी व पोलिसांनी पैसे घेतानाचे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसणारा साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस वाहनचालकाची चौकशी करण्याची सूचना वरिष्ठांनी दिली आहे.
हायवे पेट्रोलिंगच्या नावे सुवर्णविधानसौधच्या समोरच ट्रक चालकांची लूट सुरू आहे. ट्रक अडवून चालकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये गोळा करण्यात येत आहेत. ‘तुमच्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरण्यात आला आहे, त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल’ असे सांगत पैसे गोळा करण्यात येत आहेत. एका ट्रक चालकाने तर पैसे गोळा करणाऱ्या अधिकारी व पोलिसांशी केलेले संभाषण व्हायरल झाले आहे. महामार्गावर सुरू असलेल्या या वसुलीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. ‘प्रत्येक ट्रिपला तुम्हाला दोनशे रुपये द्यावे लागले तर आम्ही पोटाला काय खायचे?’ असा प्रश्न एका ट्रक चालकाने पोलिसांना विचारला आहे. ‘तू तुझ्या मालकाला सांग आणि पैसे आणून दे’, असा सल्ला पोलीस वाहनातील अधिकारी व चालकाने त्या ट्रक चालकाला दिला आहे. एकूण 4 मिनिटे 4 सेकंदाच्या या व्हिडिओमुळे महामार्गावर सुरू असलेली लूट सामोरी आली आहे. आता पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग संबंधितांवर कोणती कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.