For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदर्भाची दाणादाण, अवघ्या 105 धावांत खुर्दा

06:58 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदर्भाची दाणादाण  अवघ्या 105 धावांत खुर्दा
Advertisement

घरच्या मैदानावर मुंबईचे गोलंदाज चमकले : अजिंक्य रहाणे, मुशीर खानची अर्धशतके,

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

वानखेडे स्टेडियमच्या हिरवळीवर मुंबईच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना विदर्भाला अवघ्या 105 धावांवर गुंडळाले. रणजी करंडकाच्या फायनलमध्ये मुंबईने दुसऱ्या दिवशी 2 बाद 141 धावा करत तब्बल 260 धावांची आघाडी घेतली आहे. मुंबईकडून कर्णधार अजिंक्य रहाणे व मुशीर खान यांनी नाबाद अर्धशतके झळकावली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रहाणे 58 तर मुशीर 51 धावांवर खेळत होते. विशेष म्हणजे, फिरकीला साथ देणाऱ्या वानखेडेवर विदर्भाचे खेळाडू सपशेल अपयशी ठरले.

Advertisement

प्रारंभी, विदर्भाने 3 बाद 31 धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण अवघ्या 74 धावांत विदर्भाचे सात फलंदाज बाद झाले आणि त्यांचा पहिला डाव 45.3 षटकांत 105 धावांवर आटोपला. अशाप्रकारे मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली. वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने मुंबईला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. त्याने सलामीवीर अथर्व तायडेला वैयक्तिक 23 धावांवर बाद केले. यानंतर यश राठोड आणि आदित्य ठाकरे यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शम्स मुलानीने आदित्य ठाकरेला 19 धावांवर बाद केले. तर कर्णधार अक्षय वाडकरलाही 5 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी विदर्भाची 5 बाद 79 अशी स्थिती झाली होती. यश राठोडने सर्वाधिक 3 चौकारासह 27 धावांचे योगदान दिले. राठोडच्या या खेळीमुळे विदर्भाला शतकी मजल मारता आली. राठोडला कोटियानने बाद करत मुंबईला मोठे यश मिळवून दिले.

शम्स मुलानीने विदर्भाला सातवा धक्का दिला. त्याने हर्ष दुबेला एका धावेवर आऊट केले. तनुष कोटियनने विदर्भाच्या संघाला पुढील दोन धक्के दिले. त्यानं प्रथम यश राठोड आणि नंतर यश ठाकूरला (16 धावा) बाद केले. मुंबईसाठी शेवटची विकेट तनुषनेच मिळवली. त्यानं उमेश यादवला बाद करत विदर्भाला 105 धावांवर ऑलआउट केले. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शम्स मुलाणी व तनुष कोटियान यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. शार्दुल ठाकूरने एक विकेट घेतली.

अंतिम सामन्यात रहाणे चमकला, मुशीरचेही अर्धशतक

हिल्या डावात मुंबईने 119 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश ठाकूर आणि दुबेने पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवानीला स्वस्तात बाद करत मुंबईला दोन धक्के दिले. पृथ्वीने 11 तर ललवानीने 18 धावा केल्या. दरम्यान, लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे व मुशीर खान यांनी संघाचा डाव सावरला. मोक्याच्या क्षणी कशी कामगिरी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ रहाणेने दाखवून दिला. दुसऱ्या डावात मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता पण अजिंक्यने यावेळी संघाला सावरले. अजिंक्यच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 2 बाद 141 अशी मजल मारली आहे. अजिंक्य व मुशीर यांनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी साकारली. यंदाच्या हंगामात फ्लॉप ठरलेल्या रहाणेने अंतिम सामन्यात मात्र अर्धशतकी खेळी साकारली. त्याने 109 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह नाबाद 58 धावा केल्या तर मुशीरने 3 चौकारासह नाबाद 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली. मुंबईकडे आता 260 धावांची आघाडी असून आज तिसऱ्या दिवशी आघाडी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

संक्षिप्त धावफलक : मुंबई प.डाव 224 व दुसरा डाव 50 षटकांत 2 बाद 141 (पृथ्वी शॉ 11, ललवाणी 18, मुशीर खान खेळत आहे 51, अजिंक्य रहाणे खेळत 58, यश ठाकूर व हर्ष दुबे प्रत्येकी एक बळी).

विदर्भ पहिला डाव सर्वबाद 105 (अथर्व तायडे 23, यश राठोड 27, आदित्य ठाकरे 19, धवल कुलकर्णी, तनुष कोटियान व शम्स मुलाणी प्रत्येकी तीन बळी).

कारकिर्दीतील अंतिम सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीला गार्ड ऑफ ऑनर

धवल कुलकर्णीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो गोलंदाजी करायला आला, तेव्हा मुंबईच्या खेळाडूंनी त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. यादरम्यान त्याने मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी हस्तांदोलन केले. रहाणेनेही शेवटच्या सामन्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. 17 वर्षापासून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या धवलने अंतिम सामन्यातही शानदार कामगिरी साकारली. धवलने कारकिर्दीत 95 प्रथम श्रेणी सामने खेळले. या कालावधीत त्याने 27.31 च्या सरासरीने 281 विकेट्स घेतल्या आहेत. 50 धावांत 7 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.

Advertisement

.