विदर्भ तिसऱ्यांदा इराणी करंडकाचा मानकरी
शेष भारताचा 93 धावांनी पराभव : दुबे, ठाकूर प्रभावी
वृत्तसंस्था/ नागपूर
हर्ष दुबे आणि यश ठाकुर यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रविवारी येथे इराणी क्रिकेट करंडकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरताना शेष भारताचा 93 धावांनी पराभव केला. शेष भारतातर्फे यश धूल आणि मानव सुतार यांची अर्धशतके वाया गेली. 143 धावांची खेळी करणाऱ्या विदर्भ संघातील अथर्व तायडेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यातील रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी दुसऱ्या सत्रातच विदर्भने शेष भारताला दुसऱ्या डावात 267 धावांवर रोखत विजय नोंदविला. या सामन्यात विदर्भ संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेने 73 धावांत 4 तर यश ठाकुरने 47 धावांत 2 गडी बाद केले. विदर्भ संघाने आतापर्यंत 3 वेळा इराणी करंडक सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. मात्र यावेळी या सामन्यातील विजयाचे श्रेय प्रामुख्याने हर्ष दुबे आणि यश ठाकुर यांना द्यावे लागेल. दुबे आणि ठाकुर यांनी या सामन्यातील दुसऱ्या डावात 6 गडी बाद केले. अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे विदर्भला या सामन्यात शेष भारताचे 20 गडी बाद करता आले.
शेष भारताने 2 बाद 30 या धावसंख्येवरुन रविवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. पण उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात शेष भारताने आणखी 4 गडी 103 धावांची भर घालत गमविले. त्यामुळे त्यांची स्थिती 6 बाद 133 अशी केविलवाणी झाली होती. यश धूल आणि मानव सुतार या जोडीने आपल्या संघाचा संभाव्य पराभव बराच लांबविला. या जोडीने 7 व्या गड्यासाठी 104 धावांची शतकी भागिदारी केली. पण यश ठाकुरने धूलला अथर्व तायडेकरवी झेलबाद केल्याने शेष भारताचे आव्हान संपुष्टात आले. धूलचे शतक केवळ 8 धावांनी हुकले. धूल बाद झाल्यानंतर यश ठाकुरने आपल्या या षटकातील पुढील चेंडूवर आकाशदीपचा त्रिफळा उडविला. त्यानंतर दुबेने विदर्भचा शेवटचा गडी बाद करत शेष भारताचे आव्हान संपुष्टात आणले.
या सामन्यात विदर्भच्या पहिल्या डावात 143 धावांची शतकी खेळी करणाऱ्या अथर्व तायडेने धूलचा सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपल्याने त्याला या सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. विदर्भच्या पहिल्या डावात अभिमन्यू ईश्वरनने अर्धशतक झळकाविले. या सामन्यात शेष भारताच्या पहिल्या डावात पार्थ रेखाडे तर दुसऱ्या डावात हर्ष दुबेची फिरकी गोलंदाजी महत्त्वाची ठरली. गेल्या वर्षी झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत हर्ष दुबेने सर्वाधिक बळी घेतले होते. आता तो पुन्हा 2025 च्या क्रिकेट हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखत असल्याचे दिसून येते.
संक्षिप्त धावफलक - विदर्भ प. डाव 342, शेष भारत प. डाव 214, विदर्भ दु. डाव 232, शेष भारत दु. डाव 73.5 षटकात सर्व बाद 267 (यश धूल 92, मानव सुतार 56, हर्ष दुबे 4-73, यश ठाकुर 2-47).