विदर्भ संघाची वाटचाल जेतेपदाकडे
वृत्तसंस्था / नागपूर
2025 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विदर्भने शेष भारत संघाला विजयासाठी 361 धावांचे कठीण आव्हान दिले असून शेष भारताने दुसऱ्या डावात दिवसअखेर 2 बाद 30 धावा जमविल्या आहेत. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी असून विदर्भचा संघ मोठ्या विजयाने वाटचाल करीत आहेत.
या सामन्यात शेष भारताने पहिल्या डावात 214 धावा जमविल्यानंतर विदर्भने पहिल्या डावात 342 धावा जमवित 128 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर विदर्भने दुसऱ्या डावात 232 धावा जमवित शेष भारताला विजयासाठी 361 धावांचे आव्हान दिले. पण शेष भारताची दुसऱ्या डावात स्थिती 2 बाद 30 अशी झाली आहे. रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी शेष भारत संघाला विजयासाठी 331 धावांची जरुरी असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. शनिवारी खेळाच्याचौथ्या दिवशी किरकोळ पावसाला प्रारंभ झाल्याने पंचांनी खेळ लवकर थांबविण्याचा निर्णय घेतला.
विदर्भने 2 बाद 96 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. ध्रुव शोरेने 1 चौकारासह 27, अमन मोखाडेने 3 चौकारांसह 37, कर्णधार अक्षय वाडकरने 4 चौकारांसह 36, हर्ष दुबेने 2 षटकार आणि 3 चौकारांसह 29, दर्शन नलकांडेने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 35, यश ठाकुरने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. शेष भारतातर्फे कंबोजने 34 धावांत 4 तर सारांश जैन, मानव सुतार आणि ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. विदर्भ संघाने आतापर्यंत दोनवेळा इराणी करंडक जिंकला असून आता ते तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
विदर्भकडून 361 धावांचे कडवे आव्हान मिळाल्यानंतर शेष भारत संघावर अधिकच दडपण आल्याचे जाणवले. दुबेने शेष भारताचा सलामीचा फलंदाज ईश्वरनला पायचीत केले. त्याने 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. तर ठाकरेने आर्यन जुयेलचा 6 धावांवर त्रिफळा उडविला. इशान किसन 5 तर कर्णधार पाटीदार 2 धावांवर खेळत आहे. 12 षटकात शेष भारताने 2 बाद 30 धावांपर्यंत मजल मारली आहे. विदर्भतर्फे हर्ष दुबे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: विदर्भ प. डाव 342, शेष भारत प. डाव 214, विदर्भ दु. डाव 94.1 षटकात सर्वबाद 232 (मोखाडे 37, अक्षय वाडकर 36, नलकांडे 35, कंबोज 4-34, ब्रार, सारांश जैन आणि मानव सुतार प्रत्येकी 2 बळी), शेष भारत दु. डाव 12 षटकात 2 बाद 30, इशान किसन खेळत आहे 5, पाटीदार खेळत आहे 2, ईश्वरन 17, जुयेल 6, दुबे व ठाकरे प्रत्येकी 1 बळी).