विदर्भ, मुंबई रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
मुंबईचा पहिल्या डावातील आघाडीवर विजय, कर्नाटक पराभूत
वृत्तसंस्था/ नागपूर, मुंबई
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि मुंबई यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. नागपूरमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भने कर्नाटकाचा 128 धावांनी दणदणीत पराभव केला. तर मुंबईतील अन्य एका सामन्यात यजमान मुंबईने बडोदा संघावर पहिल्या डावातील घेतलेल्या 36 धावांच्या आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. विदर्भच्या आदित्य सरवटेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
विदर्भ आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 460 धावा जमविल्यानंतर कर्नाटकाचा पहिला डाव 286 धावांत आटोपला. विदर्भने 174 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर विदर्भचा दुसरा डाव 196 धावांत संपुष्टात आल्याने कर्नाटकाला निर्णायक विजयासाठी 371 धावांचे कठिण आव्हान मिळाले. पण त्यांचा दुसरा डाव 62.4 षटकात 243 धावात आटोपल्याने कर्नाटकाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
या सामन्यात कर्नाटकाने 1 बाद 103 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. कर्णधार मयांक अगरवाल 70 धावांवर बाद झाला. सरवटेने त्याला बाद केले. सरवटेने यानंतर निकिन जोश आणि मनिष पांडे यांचे बळी मिळविले. जोशला खाते उघडता आले नाही. तर पांडेने 1 धाव जमविली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला के. व्ही. अनिषने 40 धावा जमविल्या. त्याने हार्दिक राज समवेत सहाव्या गड्यासाठी 40 धावांची भागिदारी केली. एकेरी धाव घेण्याच्या नादात तो धावचीत झाला. सरवटे आणि दुबे यांनी कर्नाटकाचे शेवटचे फलंदाज झटपट गुंडाळले. शरथने 6 धावा केल्या. विजयकुमार विशाख आणि कविरप्पा यांनी 33 धावांची भागिदारी केली. विशाखने 34 तर कविरप्पाने 25 धावा जमविल्या. सरवटेने 78 धावांत 4 तर दुबेने 65 धावांत 4 गडी बाद केले. आता या स्पर्धेत विदर्भ, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि मुंबई यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
संक्षिप्त धावफलक - विदर्भ प. डाव 460, दु. डाव 196, कर्नाटक प. डाव 286, दु. डाव 62.4 षटकात सर्व बाद 243 (समर्थ 40, मयांक अगरवाल 70, अनिष 40, विशाख 34, कविरप्पा 25, हर्ष दुबे 4-65, सरवटे 4-78).
मुंबईच्या तनुष कोटियन-तुषार देशपांडे यांची शतके
मुंबईतील बीकेसी मैदानावर मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी यजमान मुंबई आणि बडोदा यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. मात्र या सामन्यात मुंबईने बडोदा संघावर 36 धावांच्या मिळविलेल्या महत्त्वपूर्ण आघाडीमुळे उपांत्य फेरी गाठली आहे. आता या स्पर्धेत पहिला उपांत्य सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात तर मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात दुसरा उपांत्य सामना मुंबईत खेळविला जाणार आहे.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 384 धावा जमविल्यानंतर बडोदा संघाने पहिल्या डावात 348 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 36 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर मुंबईने 9 बाद 379 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 132 षटकात 569 धावांवर संपुष्टात आला. कोटीयनने तुषार देशपांडे समवेत शेवटच्या गड्यासाठी केवळ 240 चेंडूत 232 धावांची भागिदारी केली. भागीदारीच्या विक्रमाशी बरोबरी करण्यास त्यांना एक धाव कमी पडली. अजय शर्मा व मनिंदर सिंग यांनी हा विक्रम नेंदवला होता. कोटीयनने 129 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 120 तर तुषार देशपांडेने 129 चेंडूत 8 षटकार आणि 10 चौकारांसह 123 धावा जमविल्या. कोटीयन आणि तुषार देशपांडे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली पहिलीच शतके नोंदविली. बडोदा संघाला निर्णायक विजयासाठी 605 धावांची गरज होती. बडोदा संघाने दुसऱ्या डावात 30 षटकात 3 बाद 121 धावा झाल्या असताना उभय संघांच्या कर्णधारांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. बडोदा संघाच्या दुसऱ्या डावात मोलीयाने 54 धावा जमविल्या. तर मुंबईच्या कोटीयनने 16 धावात 2 गडी बाद केले. या सामन्यात मुंबईच्या पहिल्या डावात नाबाद द्विशतक झळकाविणाऱ्या मुशिर खानला सामनावीर म्हणून जाहिर करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक - मुंबई प. डाव 384, मुंबई दु. डाव 132 षटकात सर्व बाद 569 (तेमोरे 114, शॉ 87, मुलानी 54, कोटीयान नाबाद 120, तुषार देशपांडे 123, भार्गव भट्ट 7-200), बडोदा प. डाव 348, दु. डाव 30 षटकात 3 बाद 121 (मोलीया 54, कोटीयान 2-16).