For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदर्भ-मध्यप्रदेश रणजी लढत रंगतदार स्थितीत

06:41 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदर्भ मध्यप्रदेश रणजी लढत रंगतदार स्थितीत
Advertisement

वृत्तसंस्था/ नागपूर

Advertisement

2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या यजमान विदर्भ व मध्यप्रदेश यांच्यातील सामना रंगतदार स्थितीत पोहोचला असून दोघांनाही विजयाची समान संधी आहे. विदर्भला आणखी चार बळी मिळवायचे आहेत तर मध्यप्रदेशला 93 धावांची गरज आहे. या स्पर्धेत मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे.

या स्पर्धेतील मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर मध्यप्रदेश संघाला निर्णायक विजयासाठी आणखी 93 धावांची गरज असून त्यांचे 4 गडी खेळावयाचे आहेत. दिवसअखेर मध्यप्रदेशने दुसऱ्या डावात 71 षटकात 6 बाद 228 धावा जमविल्या होत्या. या सामन्यात विदर्भने मध्यप्रदेशला विजयासाठी 321 धावांचे आव्हान दिले आहे.

Advertisement

या सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 170 धावा जमविल्यानंतर मध्यप्रदेशने पहिल्या डावात 252 धावा जमवित 82 धावांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर विदर्भने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत 402 धावांचा डोंगर उभा केला. विदर्भच्या दुसऱ्या डावात यश राठोडने शानदार शतक झळकवले. अक्षय वाडकरने 77 तर अमन मोखाडेने 59 धावांचे योगदान दिले. या सामन्यात मंगळवारी विदर्भच्या दुसऱ्या डावात यश राठोडने आपले शतक झळकवले. त्याने 200 चेंडूत 2 षटकार आणि 18 चौकारांसह 141 धावांची खेळी केली. विदर्भने 6 बाद 343 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 4 गडी 59 धावांची भर घालत तंबूत परतले. मध्यप्रदेशतर्फे अनुभव अगरवालने 92 धावांत 5 गडी बाद केले.

मध्यप्रदेशने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मध्यप्रदेश संघातील यश दुबे आणि हर्ष गवळी यांनी शानदार अर्धशतके झळकवली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 106 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. दुबेने 212 चेंडूत 10 चौकारांसह 94 धावा जमविल्या. त्याचे शतक 6 धावांनी हुकले. हर्ष गवळीने 80 चेंडूत 11 चौकारांसह 67 धावा जमविल्या. मध्यप्रदेशची ही जोडी फुटल्यानंतर त्यांचे इतर फलंदाज लवकर बाद झाले. पहिल्या डावात शतक झळकाविणाऱ्या हिमांषू मंत्रीने केवळ 8 धावा जमविल्या. सागर सोळंकीने 12, शिवम शर्माने 6, वेंकटेश अय्यरने 19 धावा केल्या. सारांश जैन 16 धावांवर खेळत असून त्याला कुमार कार्तिकेयची साथ मिळाली आहे. विदर्भतर्फे आदित्य सरवटेने 51 धावात 2 तर अक्षय वाखरेने 38 धावात 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - विदर्भ प. डाव 170, दु. डाव 101.3 षटकात सर्व बाद 402 (यश राठोड 141, अक्षय वाडकर 77, अमन मोखाडे 59, अनुभव अगरवाल 5-92), मध्यप्रदेश प. डाव सर्व बाद 252, दु. डाव 71 षटकात 6 बाद 228 (यश दुबे 94, हर्ष गवळी 67, सोळंकी 12, अय्यर 19, मंत्री 8, आदित्य सरवटे 2-51, अक्षय वाखरे 3-38).

Advertisement
Tags :

.