विदर्भची मुंबईवर एकूण 260 धावांची आघाडी
मुंबईच्या आकाश आनंदचे शतक, रेखाडेचे 4 बळी, राठोडचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ नागपूर
यश राठोड व अक्षय वाडकर यांनी अभेद्य 91 धावांची भागीदारी केल्याने रणजी करंडक उपांत्य सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विदर्भने मुंबईवरील आघाडी 260 धावांवर नेऊन ठेवली आहे. विदर्भने आधी मुंबईचा पहिला डाव 270 धावांत गुंडाळून 113 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर दुसऱ्या डावात शम्स मुलानीच्या भेदक माऱ्यामुळे विदर्भची स्थिती 4 बाद 56 अशी झाली हाती. पण राठोड (नाबाद 59) व वाडकर (नाबाद 31) यांनी डाव सावरत पाचव्या गड्यासाठी अभेद्य 91 धावांची भागीदारी केली. दिवसअखेर विदर्भने दुसऱ्या डावात 53 षटकांत 4 बाद 147 धावा जमविल्या. मुलानी व फिरकी गोलंदाज भेदक गोलंदाजी करीत असल्याने विदर्भला दक्ष रहावे लागणार आहे. या सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी आहेत.
पहिल्या डावात 113 धावांची आघाडी मिळविल्यानंतर यजमान विदर्भची दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र खराब झाली. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शार्दुल ठाकुरने अथर्व तायडेला पायचीत केले. दानिश मालेवार (29) चांगल्या टचमध्ये दिसला. पण मुलानीने स्वताच्याच गोलंदाजीवर त्याला झेलबाद केले. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला करुण नायर (6) ध्रुव शोरेच्या (13) साथीला आला. पण तनुष कोटियनने शोरेला पायचीत केले. नायरही यावेळी काही करू शकला नाही. मुलानीने त्याला बाद केल्यानंतर त्यांची स्थिती 4 बाद 56 अशी झाली. वाडकर व राठोड यांनी नंतर 91 धावांची डाव सावरणारी भागीदारी केली. तत्पूर्वी, 7 बाद 188 या धावसंख्येवरून मुंबईने खेळाला पुढे सुरुवात केली. आकाश आनंदने प्रथमश्ंाdरेणीतील दुसरे शतक पूर्ण केले आणि तनुष कोटियनसमवेत (33) 69 धावांची भागीदारी करीत मुंबईला अडीचशेची मजल मारून दिली. आकाश आनंदने 256 चेंडूंच्या खेळीत 11 चौकारांसह 106 धावा जमविल्या. पार्थ रेखाडेने ही जोडी फोडताना कोटियनला बाद केले. नंतर हर्ष दुबेने मोहित अवस्थीला बाद करून मुंबईचा डाव 270 धावांत संपवला. रेखाडेने 55 धावांत 4 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ 383 व 53 षटकांत 4 बाद 147 (राठोड नाबाद 59, वाडकर नाबाद 31, शम्स मुलानी 2-50), मुंबई 92 षटकांत सर्व बाद 270 (आकाश आनंद 106, कोटियन 33, पार्थ रेखाडे 4-55).