विदर्भ-केरळ रणजी अंतिम सामना आजपासून
वृत्तसंस्था / नागपूर
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत माजी विजेता विदर्भ आणि केरळ यांच्यातील अंतिम सामन्याला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. सदर सामना नागपूर होत असल्याने विदर्भला त्याचा अधिक फायदा मिळू शकेल.
देशातील ही सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेला 90 वर्षांचा इतिहास आहे. आता या स्पर्धेतील 90 व्या रणजी करंडकासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातील अंतिम सामना चुरशीचा अपेक्षित आहे. विदर्भने पाच वर्षांपूर्वी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. तर केरळने पहिल्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. अक्षय वाडकर विदर्भ संघाचे नेतृत्व करीत असून सचिन बेबीकडे केरळच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वाडकरच्या नेतृत्वाखाली विदर्भ संघाने चालु रणजी हंगामात दर्जेदार कामगिरी करताना प्राथमिक गट फेरीमध्ये 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. या सहा सामन्यामध्ये त्यांनी आपल्या अष्टपैलु कामगिरीचे दर्शन घडविले आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या बाद फेरी टप्प्यात प्रतिस्पर्धी संघांचा मोठ्या फरकाने पराभव करत आपली वाटचाल केली आहे. उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भने तामिळनाडूचा 198 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली तर उपांत्य सामन्यात विदर्भने विद्यमान विजेत्या मुंबईचा 80 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. विदर्भ संघाने आतापर्यंत दोनवेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. 2017-18 तसेच 2018-19 साली सलग दोनवेळा रणजी स्पर्धा जिंकली आहे. विदर्भ संघाने या स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. गेल्या वर्षी त्यांना या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबईकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2024-25 क्रिकेट हंगामात विदर्भने विजय हजारे करंडक हजारे क्रिकेट स्पर्धेतही अंतिम फेरी गाठली होती.
विदर्भ संघातील यश राठोड हा प्रमुख फलंदाज असून त्याने या रणजी हंगामात 58.13 धावांच्या सरासरीने 9 सामन्यात 933 धावा जमविताना 5 शतके आणि 3 अर्धशतके नोंदविली आहेत. चालु रणजी हंगामात सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांमध्ये राठोड तिसऱ्या स्थानावर आहे. विदर्भचा यष्टीरक्षक आणि फलंदाज कर्णधार अक्षय वाडकरने आपल्या कामगिरीत सातत्य राखून या स्पर्धेत आतापर्यंत 9 सामन्यातून 48.14 धावांच्या सरासरीने 674 धावा जमविल्या असून त्यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. विदर्भ संघातील करुण नायर हा आणखी एक महत्त्वाचा फलंदाज आहे. नायरने 8 सामन्यातून 45.85 धावांच्या सरासरीने 642 धावा जमविल्या असून त्यामध्ये 3 शतके आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. विदर्भ संघातील दानिश मालेवारने आतापर्यंत या स्पर्धेत 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 557 धावा तर ध्रुव शोरेने 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 446 दावा जमविल्या आहेत. केरळच्या तुलनेत विदर्भची फलंदाजी सध्या तरी अधिक भक्कम वाटते. गोलंदाजीमध्ये विदर्भच्या 22 वर्षीय हर्ष दुबेने दर्जेदार कामगिरी करताना 9 सामन्यात 66 गडी बाद केले आहेत. बिहारच्या अशुतोष अमनने 2018-19 च्या रणजी हंगामात 8 सामन्यातून 68 बळी घेण्याचा विक्रम केला असून हा विक्रम मोडीत काढण्यासाठी दुबेला आणखी तीन गडी बाद करावे लागतील.
केरळ संघाने रणजी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. सचिन बेबीच्या नेतृत्वाखाली केरळ संघाला या रणजी हंगामात नशीबाची चांगलीच आतापर्यंत मिळाली आहे. बाद फेरीतील जम्मू काश्मिर विरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केरळने केवळ 1 धावेच्या फरकाने उपांत्य फेरी गाठली आहे. तर उपांत्य सामन्यात केरळने गुजरातचा केवळ दोन धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पहिल्या डावातील घेतलेल्या आघाडीच्या जोरावर केरळने यावेळी अंतिम फेरी पहिल्यांदा गाठण्याचा मान मिळविला आहे. जम्मू काश्मिरबरोबरचा उपांत्यपूर्व फेरीचासामना शेवटच्या दिवशी अनिर्णीत राहिला. केरळ संघातील फलंदाज सलमान निझारने चालु वर्षीच्या रणजी हंगामात 8 सामन्यातून 86.71 धावांच्या सरासरीने 607 धावा जमविताना 2 शतके आणि 3 अर्धशतके नोंदविले आहेत. मोहम्मद अझहरुद्दीन हा या संघातील आणखी एक भरवशाचा फलंदाज आहे. त्याने 9 सामन्यातून 75.12 धावांच्या सरासरीने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 601 धावा जमविल्या आहेत. गुजरात विरुद्धच्या उपांत्य सामन्यात अझहरुद्दीनने 341 चेंडूत 177 धावांची खेळी केली होती. केरळ संघातील जलाज सक्सेना हा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने या स्पदोंत आतापर्यंत 38 गडी बाद केले आहेत. सक्सेनाला विदर्भचा माजी रणजीपटू आदित्य सरवटेची बऱ्यापैकी साथ मिळत आहे. सरवटे सध्या केरळ संघाकडून खेळत आहे. सरवटेने आतापर्यंत 30 गडी बाद केले आहेत.
विदर्भ संघ- अक्षय वाडकर (कर्णधार), अथर्व तायडे, अमान मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कार्नेवार, यश कदम, अक्षय वाखरे, आदित्य ठाकरे, दर्शन मलकांडे, नचिकेत भूते, सिद्धेश वाथ, यश ठाकुर, दानिश मालेवाल, पार्थ रेखाडे, करुण नायर व ध्रुव शोरे,
केरळ: सचिन बेबी (कर्णधार), आर. कुनुमल, सलमान निझार, मोहम्मद अझहरुद्दीन, अक्षय चंद्रन, सक्सेना, एस. रॉजेर, आदित्य सरवटे, बसील थंपी, निदेश, एन. बसील, श्रीहरी नायर, शरफुद्दीन, आनंद कृष्णन, वरुण नयनार, इडेन टॉम, आणि अहम्मद इम्रान.