विदर्भ, हरियाणा उपांत्य फेरीत दाखल
वृत्तसंस्था/ बडोदा
2024-25 च्या क्रिकेट हंगामातील सुरु असलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत रविवारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भने राजस्थानचा 9 गड्यांनी तर दुसऱ्या एका सामन्यात हरियाणाने गुजरातचा दोन गड्यांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. आता हरियाणा आणि कर्नाटक यांच्यात उपांत्य फेरीचा सामना बुधवारी तर विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यातील उपांत्य लढत गुरुवारी येथे खेळवली जाईल.
विदर्भ आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 50 षटकात 8 बाद 291 धावा जमविल्या. त्यानंतर विदर्भने 43.3 षटकात 1 बाद 292 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी एकतर्फी जिंकला. राजस्थानच्या डावामध्ये कार्तिक शर्माने 61 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 62 तर शुभम गरेवालने 59 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 59, दिपक चहरने 14 चेंडूत 31 आणि दीपक हुडाने 49 चेंडूत 45 व कर्णधार महिपाल रोमरोरने 45 चेंडूत 32 धावा जमविल्या. विदर्भतर्फे यश ठाकुरने 39 धावांत 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विदर्भच्या डावामध्ये करुण नायरने 82 चेंडूत 5 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 122 धावांची खेळी केली. या स्पर्धेतील करुण नायरचे हे पाचवे शतक आहे. ध्रुव शोरेने 130 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 118 धावा झळकाविल्या. शोरे आणि नायर या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 29 षटकात अभेद्य 200 धावांची भागिदारी केली. 33 वर्षीय करुण नायरने या स्पर्धेत गेल्या 8 सामन्यात 637 धावा जमविल्या आहेत. यश राठोडने 39 धावांचे योगदान दिले.
हरियाणा विजयी
दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हरियाणाने गुजरातवर 2 गड्यांनी मात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा डाव 45.2 षटकात 196 धावात आटोपला. त्यानंतर हरियाणाने 44 षटकात 8 बाद 201 धावा जमवित विजय नोंदविला. गुजरातच्या डावामध्ये हेमांग पटेलने 54 तर चिंतन गजाने 32 धावांचे योगदान दिले. हरियाणातर्फे अनुज ठकराल आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हरियाणाच्या डावात हिमांशू राणाने 66, पार्थ वत्सने 38 धावा केल्या. गुजरातच्या रवी बिश्नोईने 46 धावांत 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - गुजरात 45.2 षटकात सर्वबाद 196 (हेमांग पटेल 54, चिंतन गजा 32, अनुज ठकराल 3-39, निशांत सिंधू 3-40), हरियाणा 44 षटकात 8 बाद 201 (हिमांशू राणा 66, पार्थ वत्स 38, बिश्नोई 4-46).
राजस्थान 50 षटकात 8 बाद 291 (कार्तिक शर्मा 62, शुभम गरेवाल 59, दीपक हुडा 45, दीपक चहर 31, यश ठाकुर 4-39), विदर्भ 43.3 षटकात 1 बाद 292 (करुण नायर नाबाद 122, ध्रुव शोरे नाबाद 118, यश राठोड 39).