विदर्भ, गुजरातची उपांत्य फेरीकडे वाटचाल
रणजी उपांत्यपूर्व लढती, केरळला नाममात्र पहिल्या डावात आघाडी
वृत्तसंस्था / नागपूर, राजकोट, पुणे
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सध्या सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या विविध लढतीमध्ये विदर्भ आणि गुजरात या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर भक्कम आघाडी घेत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे. तर केरळने जम्मू काश्मिरवर पहिल्या डावात केवळ एका धावेची नाममात्र आघाडी मिळविली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान विदर्भने तामिळनाडू संघावर 297 धावांची आघाडी मिळविली आहे. या सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 353 धावा जमविल्यानंतर तामिळनाडूचा पहिला डावा 225 धावांत आटोपला. विदर्भने पहिल्या डावात 128 धावांची आघाडी घेतली. तामिळनाडूने 6 बाद 159 धावसंख्येवरुन सोमवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डावा 225 धावांत आटोपला. तामिळनाडू संघातल सिद्धार्थने 2 षटकार आणि 10 चौकारांसह 65, रंजन पॉलने 4 चौकारांसह 48, सोनू यादवने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 32, जगदीशन् आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. विदर्भच्या आदित्य ठाकरेने 34 चेंडूत 5 गडी बाद केले. यश ठाकुर आणि भुते यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
128 धावांची आघाडी घेतल्यानंतर विदर्भने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि दिवसअखेर त्यांनी 62 षटकात 5 बाद 169 धावा जमवित तामिळनाडूवर 297 धावांची आघाडी मिळविली. विदर्भच्या दुसऱ्या डावात यश राठोड 5 चौकारांसह 55 धावांवर तर हर्ष दुबे 2 षटकार आणि 1 चौकारासह 29 धावांवर खेळत आहे. करुण नायर 1 षटकार आणि 2 चौकारांसह 29 धावांवर बाद झाला. शोरेने 20 तर तायडेने 19 धावा केल्या. तामिळनाडूच्या साई किशोरने 2 तर सोनु यादव, विजय शंकर आणि अजित राम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: विदर्भ प. डाव 353, तामिळनाडू प. डाव 225, विदर्भ दु. डाव 62 षटकात 5 बाद 169.
केरळला नाममात्र आघाडी
पुणे येथे सुरू असलेल्या रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी केरळने जम्मू काश्मिरवर पहिल्या डावात केवळ 1 धावेची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. दिवसअखेर जम्मू काश्मिरने दुसऱ्या डावात 3 बाद 180 धावा जमवित केरळवर 179 धावांची बढत घेतली आहे.
या सामन्यात जम्मू काश्मिरचा पहिला डाव 280 धावांत आटोपला. त्यानंतर केरळने 9 बाद 200 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. दरम्यान सलमान निझार आणि थंपी या शेवटच्या जोडीने 81 धावांची भागिदारी केली. निझारने 172 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 112 धावा झळकविल्या. थंपी 2 चौकारांसह 15 धावांवर बाद झाला. जम्मू काश्मिरच्या अकिब नबीने 53 धावांत 6 तर युधवीर सिंग आणि लोथ्रा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
जम्मू काश्मिरने दिवसअखेर दुसऱ्या डावात 57 षटकात 3 बाद 180 धावा जमविल्या. कर्णधार डोग्रा 148 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 73 तर वाधवान 80 चेंडूत 3 चौकारांसह 42 धावांवर खेळत आहे. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 102 धावांची शतकी भागिदारी केली आहे. केरळतर्फे निदेशने तर बसीलने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: जम्मू काश्मिर प. डाव 280, केरळ प. डाव 85 षटकात सर्वबाद 281 (सलमान निझार नाबाद 112, सक्सेना 67, निदेश 30, अकिब नबी 6-53), जम्मू काश्मिर दु. डाव 57 षटकात 3 बाद 180 (डोग्रा खेळत आहे 73, वाधवान खेळत आहे 42, व्ही. शर्मा 37, निदेश 2-45)
गुजरातला 295 धावांची आघाडी
राजकोटमध्ये सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसअखेर गुजरातने पहिल्या डावात 511 धावांचा डोंगर उभा करुन सौराष्ट्रवर 295 धावांची भक्कम आघाडी मिळविली. तत्पूर्वी सौराष्ट्रने पहिल्या डावात 216 धावा केल्या होत्या. दिवसअखेर सौराष्ट्रने दुसऱ्या डावात बिनबाद 33 धावा जमविल्या.
गुजरातच्या पहिल्या डावामध्ये जयमित पटेलने 171 चेंडूत 103 धावा झळकविल्या. उर्विल पटेलने 197 चेंडूत 140 धावांचे योगदान दिले. मनन हिंग्रेजाने 219 चेंडूत 83 धावा जमविल्या. सौराष्ट्रतर्फे धमेंद्र जडेजाने 120 धावांत 5 गडी बाद केले. गुजरातच्या उर्विल पटेलने जडेजाच्या गोलंदाजीवर 4 षटकार खेचले. पाचवा षटकार मारण्याच्या नादात यष्टीरक्षक करवी यष्टीचित झाला. गुजरातने आपली वाटचाल उपांत्यफेरीकडे केली आहे.
संक्षिप्त धावफलक: सौराष्ट्र प. डाव 216, गुजरात प. डाव 511 (जयमित पटेल 103, उर्विल पटेल 140, हिंग्रेजा 83, डी. जडेजा 5-120), सौराष्ट्र दु. डाव 16 षटकात बिनबाद 33),