विद्यमान विजेत्या मुंबईला विदर्भाने हरवले
शानदार विजयासह विदर्भ रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये : केरळ-विदर्भ यांच्यात रंगणार अंतिम लढत
वृत्तसंस्था/ नागपूर, अहमदाबाद
विदर्भाने मुंबईचा पराभव करत रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. गतवर्षी मुंबईने विदर्भचा अंतिम फेरीत पराभव करत विक्रमी 42 वे रणजी करंडक पटकावले होते. आता विदर्भने मुंबईच्या स्टार खेळाडूंनी सजलेल्या संघाला विजयाची कोणतीच संधी न देता गतवर्षीच्या पराभवाचा बदला घेत 80 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अन्य एका सामन्यात पहिल्या डावातील अवघ्या दोन धावांच्या आघाडीच्या जोरावर केरळने फायनल गाठली आहे. आता, 26 फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि केरळ यांच्यात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जाईल.
अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर... असे एकामागून एक दिग्गज खेळाडू असलेल्या मुंबईला अखेर विदर्भासमोर शरणागती पत्करावी लागल्याचे पहायला मिळाले. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईसारख्या दिग्गज संघावर विदर्भाने 80 धावांनी दमदार विजय साकारत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. फक्त एका रनआऊटमुळे मुंबईला हा पराभव पत्करावा लागल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर विदर्भाने पहिल्या डावात 383 धावा केल्या. यानंतर मुंबईला मात्र 270 धावापर्यंतच मजल मारता आली. यामुळे विदर्भाला पहिल्या डावात 113 धावांची आघाडी मिळाली. विदर्भाने दुस्रया डावात 292 धावांची खेळी केली. विदर्भासाठी पार्थ रेखाडे याने सर्वाधिक 151 धावा केल्या. तर अक्षय वाडेकर याने 52 धावा जोडल्या. तर विदर्भाकडे 113 धावांची आघाडी होती. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 406 धावांचं आव्हान मिळालं.
शार्दुलची एकाकी झुंज अपयशी
विदर्भाने मुंबईला विजयासाठी 406 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार अजिंक्य रहाणे 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिवम दुबेलाही 12 धावाच करता आल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवकडून चाहत्यांना मोठी आशा होती, पण सूर्याने यावेळी निराशाच केली. त्याला 23 धावा करता आल्या. सिद्धेश लाड, आयुष म्हात्रे यांनी देखील निराशा केली. मुंबईचा संघ अडचणीत असताना शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा मदतीला धावून आला. शार्दुल आणि शम्स यांनी 103 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. ही जोडी मुंबईला विजय मिळवून देणार, असे वाटत होते. पण यावेळी या दोघांकडून एक चूक घडली आणि शम्स रन आऊट झाला. हीच विकेट सामन्याची टर्निंग पॉइंट ठरली. कारण शम्स 46 धावांवर बाद झाल्यावर शार्दुलने अर्धशतक झळकावले खरे, पण तो 66 धावांवर बाद झाला आणि तिथेच मुंबईचा पराभव निश्चित झाला. तनुष कोटियान (26), मोहित अवस्थी (34), रॉयस्टन डायस (23) या तळाच्या फलंदाजांनी थोडाफार प्रतिकार केला पण अखेरीस मुंबईचा डाव 325 धावांत आटोपला.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ पहिला डाव 383 व दुसरा डाव 292, मुंबई पहिला डाव 270 व दुसरा डाव 325.
केरळचा इतिहास, प्रथमच रणजी करंडक अंतिम फेरीत
अहमदाबाद : अवघ्या 2 धावांची निसटती आघाडी मिळवत केरळने रणजी ट्रॉफी करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तब्बल 74 वर्षांनंतर केरळने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत केरळच्या 457 धावांच्या डोंगरासमोर खेळताना गुजरातने चिवटपणे खेळ करत लढा दिला. गुजरात हा धावांचा डोंगर पार करून माफक का होईना आघाडी मिळवणार अशी चिन्हं होती. पण वादग्रस्त अशा निर्णयामुळे गुजरातचा डाव 455 धावांवर आटोपला आणि केरळला दोन धावांची आघाडी मिळाली. हीच आघाडी गुजरातच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली. दुसऱ्या डावात केरळने 4 गडी गमवून 114 धावा केल्या. पाच दिवसांचा खेळ संपल्याने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. पण पहिल्या डावात केरळकडे दोन धावांची आघाडी होती, यामुळे त्यांना अंतिम फेरीचे तिकीट मिळाले.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केरळने 457 धावा केल्या. ज्यामध्ये मोहम्मद अझरुद्दिनने दीडशतकी खेळी साकारली. केरळ संघाला गुजरातनेही जोरदार प्रत्युत्तर देताना 455 धावा केल्या. सलामीवीर प्रियांक पांचाळने 148 धावांचे योगदान दिले तर इतर फलंदाजांनीही त्याला मोलाची साथ दिली. पण, मोक्याच्या क्षणी गुजरातचा संघ 455 धावांत ऑलआऊट झाला व केरळला अवघ्या दोन धावांची आघाडी मिळाली.
दरम्यान, सामन्याच्या शेवटच्या दिवशी गुजरातची शेवटची विकेट पडताना चांगलाच ड्रामा पहायला मिळाला. गुजरातचा दहाव्या क्रमांकाचा फलंदाज अर्जन नागवासवालाने विजयाच्या आशेने एक स्लॉग स्वीप शॉट खेळला, पण चेंडू शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या सलमान निझारच्या हेल्मेटला लागला आणि नंतर स्लिपवर उभ्या असलेल्या कर्णधार सचिन बेबीकडे जातो. या विचित्र विकेटमुळे गुजरात पहिल्या डावात 455 धावांवर ऑलआऊट झाला. अंपायर्सनी देखील नागवासवालाला बाद दिल्याने गुजरातची फायनलमध्ये पोहोचण्याची संधी हुकली. अर्थात, केरळने पहिल्या डावातील दोन धावांच्या आघाडीच्या जोरावर रणजी ट्रॉफीच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली.