विदर्भ तिसऱ्यांदा रणजी चॅम्पियन
फायनल मॅच ड्रॉ : केरळच्या पदरी निराशा : दानिश मालेवार सामनावीर तर हर्ष दुबे मालिकावीर
वृत्तसंस्था/ नागपूर
येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना विदर्भ व केरळ यांच्यात रंगलेला अंतिम सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यातील पहिल्या डावात घेतलेल्या 37 धावांच्या अल्प आघाडीच्या जोरावर विदर्भाने रणजी ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. दुसरीकडे, पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या केरळ संघाची मात्र निराशा झाली. विशेष म्हणजे, विदर्भाने 2017-18 आणि 2018-19 मध्ये सलग दोनदा विदर्भाने जेतेपद पटकावले होते. यानंतर तब्बल सात वर्षानंतर रणजी जेतेपद जिंकले आहे.
प्रथमच रणजी ट्रॅाफीची फायनल खेळत असलेल्या केरळने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विदर्भची पहिल्या डावात सुरुवात अतिशय डळमळीत झाली. 24/3 अशा स्थितीतून दानिश मालेवार आणि करुण नायर यांनी चौथ्या विकेटसाठी 215 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मालेवारने 153 धावांची दिमाखदार खेळी केली. करुण 86 धावांवर बाद झाला. अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या नचिकेत भुटेने 32 धावांची खेळी केली. केरळने निधीश आणि एडन अॅपल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
केरळने पहिल्या डावात विदर्भाला जोरदार प्रत्युत्तर देताना 342 धावा केल्या, पण त्यांना आघाडी घेता आली नाही. विदर्भाला पहिल्या डावात 37 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली व हीच आघाडी त्यांच्या जेतेपदासाठी निर्णायक ठरली. केरळचा कर्णधार सचिन बेबीने सर्वाधिक 98 धावा केल्या. त्याचे शतक 2 धावांनी हुकले. याशिवाय आदित्य सरवटेने 79 धावा केल्या. विदर्भाकडून दर्शन नाळकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. यश ठाकूरनेही 1 विकेट घेतली.
करुण नायरचे शतक, विदर्भाची त्रिशतकी मजल
दुसऱ्या डावात खेळताना विदर्भाची सुरुवात खराब झाली. पण, करुण नायर व दानिश मालेवार यांनी संधीचे सोने करताना दीडशतकी भागीदारी साकारली. करुण नायरने शतकी खेळी साकारताना 135 धावा फटकावल्या. मालेवारने 73 धावांचे योगदान दिले. पाचव्या दिवशी विदर्भाने 4 बाद 249 धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. शतकवीर नायर फार काळ मैदानावर टिकला नाही. 135 धावांवर त्याला सरवटेने बाद केले. यानंतर तळाच्या फलंदाजांनी शानदार खेळी करत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. दर्शन नळकांडने नाबाद 51 धावा फटकावल्या तर अक्षय कर्नावरने 30 धावांचे योगदान दिले. यामुळे विदर्भाने 9 गडी गमावत 375 धावा केल्या. दुपारच्या सत्रात दोन्ही कर्णधारांच्या संमतीनंतर सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला आणि यानंतर विदर्भाच्या खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ पहिला डाव 379 व दुसरा डाव 143 षटकांत 9 बाद 375 (दानिश मालेवार 73, करुण नायर 135, यश राठोड 24, अक्षय वाडकर 25, अक्षय कर्नावर 30, दर्शन नळकांडे नाबाद 51, आदित्य सरवटे 4 बळी, निधीश, सक्सेना, बासील, अक्षय चंद्रन प्रत्येकी एक बळी)
केरळ पहिला डाव 342.
हर्ष दुबेचा विकेट्स पाऊस
विदर्भाच्या हर्ष दुबेने रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका मोसमात 69 विकेट्स घेऊन मोठमोठ्या गोलंदाजांना हर्षने मागे टाकले आहे. विदर्भाच्या या चमकदार कामगिरी मागे विदर्भाचा तरुण ऑलराऊंडर हर्ष दुबे अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. याशिवाय, फलंदाजीमध्येही हर्षने चांगली कामगिरी बजावत 476 धावा केल्या. रणजी स्पर्धेतील या धमाकेदार कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.