उरुग्वे, अमेरिका यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स
2024 च्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत उरुग्वे आणि अमेरिका संघांनी आपल्या मोहिमेला सलामीच्या विजयाने प्रारंभ केला. उरुग्वेने पनामाचा तर अमेरिकेने बोलिव्हियाचा पराभव केला.
मियामी गार्डन्सच्या हार्ड रॉक स्टेडियममध्ये उरुग्वे आणि पनामा यांच्यातील सामन्याला सुमारे 34 हजार शौकिन उपस्थित होते. उरुग्वेने पनामाचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. उरुग्वे संघाने आतापर्यंत 15 वेळेला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेतील 14 जुलै रोजी होणारा अंतिम सामना हार्ड रॉक स्टेडियमवर खेळविला जाईल. तसेच 2026 च्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील 7 सामने या स्टेडियममध्ये होणार आहेत. उरुग्वे आणि पनामा यांच्यातील सामन्यात 16 व्या मिनिटाला मॅक्जीमिलानो अराजोने उरुग्वेचे खाते उघडले. त्यानंतर डार्विन नुनेझ आणि मतायस व्हिना यांनी प्रत्येकी 1 गोल करुन उरुग्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. नुनेझने सामन्यातील 85 व्या मिनिटाला उरुग्वेचा दुसरा गोल केला. नुनेझचा हा गेल्या 6 आंतरराष्ट्रीय सामन्यातील 9 वा गोल आहे. पनामातर्फे एकमेव गोल अमीर मुरिलोने नोंदविला. उरुग्वे संघाने अलिकडच्या कालावधीत विश्वकरंडक पात्र फेरीतच्या फुटबॉल स्पर्धेतील लढतीत बलाढ्या अर्जेंटिनाचा तसेच त्यानंतर ब्राझीलचा पराभव केला होता. उरुग्वेने 2011 साली शेवटची कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकली होती.
टेक्सासमध्ये या स्पर्धेतील क गटात खेळविण्यात आलेल्या सामन्यात अमेरिकेने बोलिव्हियाचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. रविवारच्या या सामन्यात अमेरिकन संघातर्फे बोलिव्हियाच्या तुलनेत अधिक आक्रमक आणि दर्जेदार झाला. या स्पर्धेच्या इतिहासात गेल्या 31 सामन्यांमध्ये बोलिव्हियाने केवळ एकमेव सामना जिंकला आहे. या सामन्यात अमेरिकेचे खाते मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना पुलसिकने उघडले. पुलसिकचा 69 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा 30 वा गोल आहे. अमेरिकेने हा पहिला गोल नोंदविल्यानंतर केवळ 2 मिनिटांच्या फरकाने दुसरा गोल केला. पुलसिकने दिलेल्या पासवर बॅलोगनने अमेरिकेचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत अमेरिकेने बोलिव्हियाने 2-0 अशी आघाडी मिळवली होती. या सामन्यामध्ये बोलिव्हियाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.
सामन्यांचे निकाल
उरुग्वे वि. वि. पनामा
3-1
अमेरिका वि. वि. बोलिव्हिया
2-0