सिनेर, मेदवेदेव्ह यांचे विजय
वृत्तसंस्था/ तुरिन, इटली
एटीपी फायनल्समधील सामन्यात जेनिक सिनेरने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा पराभव केला. स्थानिक प्रेक्षकांनी सिनेर प्रचंड प्रतिसाद दिला, याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.
सिनेरने फ्रिट्झवर 6-4, 6-4 अशी मात करीत सलग दुसरा विजय मिळविला. यूएस ओपनच्या अंतिम फेरीतही या दोघांची गाठ पडली होती. त्यावेळीही सिनेरनेच विजय मिळवित जेतेपद पटकावले होते. पहिल्या सेटमध्ये त्याला एकदा मॅरेथॉन सर्व्हिस गेमला सामोरे जावे लागले.
त्याआधी झालेल्या अन्य एका सामन्यात रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने अॅलेक्स डी मिनॉरवर विजय मिळवित बाद फेरीच्या बाद फेरीच्या आशा पल्लवित केल्या. त्याने डी मिनॉरवर 6-2, 6-4 अशी मात केली. पहिल्या सामन्यात मेदवेदेव्हला फ्रिट्झकडून पराभव पत्करावा लागला होता. या गटात सिनेर आघाडीवर असून एक विजय मिळवित फ्रिट्झ व मेदवेदेव्ह त्याच्या पाठोपाठ आहेत. प्रत्येक गटात पहिले दोन क्रमांक मिळविणारे खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. गुरुवारी मेदवेदेव्हची लढत सिनेरशी तर डी मिनॉरची लढत फ्रिट्झशी होणार आहे.
सोमवारी झालेल्या अन्य गटातील लढतीत अलेक्झांडर व्हेरेव्ह व कास्पर रुड यांनी आंद्रे रुबलेव्ह व कार्लोस अल्कारेझ यांना हरविले होते. सिनेर पहिल्यांदाच आपल्या देशातील स्पर्धेत खेळत आहे.