For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्समध्ये विकास पॅनेलचा विजय

11:38 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्समध्ये विकास पॅनेलचा विजय
Advertisement

बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजची निवडणूक चुरशीने मंगळवारी पार पडली. औद्योगिक विभागासाठीच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये विकास पॅनेलचे संदीप बागेवाडी, उदय जोशी व राजेश मुचंडीकर यांनी विजय मिळविला. धुवाधार पावसातही मतदानासाठी उत्साह दिसून आला. औद्योगिक विभागासाठी एकूण 764 मतदान होते. यामध्ये संदीप बागेवाडी यांना 258, उदय जोशी यांना 252, राजेश मुचंडीकर यांना 245 तर अशोक कोळी यांना 69 मतांवर समाधान मानावे लागले. यामुळे पहिल्या तीन उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. विजयानंतर उमेदवारांनी एकच जल्लोष केला. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. प्रवीण परमशेट्टी यांनी काम पाहिले. व्यापारी-उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज कार्यरत आहे. बेळगाव चेंबरचे एकूण 26 सदस्य असून दरवर्षी 10 सदस्यांसाठी निवडणूक होत असते.

Advertisement

भरपावसात मतदानासाठी उत्साह

चेंबर ऑफ कॉमर्सच्या उद्योग गटासाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. तीन जागांसाठी 4 उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतदानाची चुरस वाढली होती. त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात मतदानासाठी मतदारांची गर्दी झाली होती. भरपावसातही मतदानासाठी उत्साह दिसून आला. दिवसभरात टप्प्याटप्प्याने मतदान घेण्यात आले. सायंकाळी 6 नंतर मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावर्षी व्यापारी गटाची निवडणूक बिनविरोध झाली. संजीव कट्टीशेट्टी, पी. एस. कट्टीमनी, मनोज मत्तीकोप्प, रमेश लड्डद व स्वप्निल शहा तर वार्षिक सर्वसाधारण सदस्य म्हणून सुधीर चौगुले यांची निवड करण्यात आली. उद्योजक गटामध्ये तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. संदीप बागेवाडी, उदय जोशी, राजेश मुचंडीकर व अशोक कोळी यांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवार दि. 25 रोजी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून या बैठकीत नूतन अध्यक्ष निश्चित करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.