राष्ट्रीय महामार्ग ठप्पची अफवाच
निपाणी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर वेदगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे. मात्र या नदीचे पाणी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आलेले नाही. मांगुर फाटा येथे काहीसा सखल भाग असल्यामुळे बाजूच्या शेतातील पाणी याठिकाणी आले आहे. नदीचे पाणी थोड्या प्रमाणात शेतातून वळून फाट्यावर आले आहे. मात्र त्यामुळे मांगुर फाट्यावर वाहतूक ठप्प असल्याची अफवा पसरली आहे. मात्र याठिकाणी आलेले पाणी हे मोठ्या नळ्यांद्वारे वळवण्याचे काम सुरू झाले आहे. मांगुर फाटा येथून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले जात आहे. सध्या मांगुर फाट्यावरून राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक सुरू असली तरी पावसाचा जोर कायम असल्यास पाणी पातळी वाढवून महामार्गाच्या एका बाजूची वाहतूक ठप्प होऊ शकते. तसे झाल्यास कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्याचा पर्याय आहे. सध्या तरी दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी पोलीस ठाण मांडून आहेत. वाहनधारकांनीही अत्यावश्यक कारण असेल तरच येथून वाहतूक करावी, असे आवाहन केले जात आहे.
-अमर गुरव, निपाणी