विदेशी खेळाडूंत व्हिक्टर वेग्नेझला सर्वाधिक बोली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडिया लीगसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी विदेशी खेळाडूंचा लिलाव झाला, त्यावेळी फ्रँचायजींनी सावधपणे खेळाडूंची निवड केली. बेल्जियमचा व्हिक्टर वेग्नेझ हा सर्वाधिक बोली मिळविणारा खेळाडू ठरला. त्याला सूरमा हॉकी क्लबने 40 लाख रुपयांना खरेदी केले.
काही लक्षणीय खरेदी झालेल्या विदेशी खेळाडूंत नेदरलँड्सच्या थिएरी ब्रिंकमन (38 लाख), ऑर्थर व्हान डोरेन (32 लाख), टॉमस डोमेने (36 लाख), ऑस्ट्रेलियाचे अॅरन झालेवस्की (27 लाख), ब्लेक गोव्हर्स (27 लाख) यांचा समावेश आहे. ब्रिंकमनला कलिंगा लान्सर्सने, डोमेनेला दिल्ली एसजी पायपर्सने, गोव्हर्सला तामिळनाडू ड्रॅगन्सने खरेदी केले. भारतीय खेळाडूंत दुसऱ्या दिवशी सर्वाधिक किंमत मिळालेल्या खेळाडूंत मोरियांगथेम रबिचंद्रा (32 लाख, कलिंगा लान्सर्स), मोहम्मद राहील मौसीन (25 लाख, तामिळनाडू ड्रॅगन्स) यांचा समावेश आहे. याशिवाय अरायजित सिंग हुंदालला टीम गोनासिकाने 42 लाखाला आपल्या संघात सामील करून घेतले.
रविवारी पहिल्या दिवशी एकूण 54 हॉकीपटूंचा लिलाव झाला, त्यात 18 विदेशी खेळाडू होते. सर्व आठ फ्रँचायजींनी एकूण 16 कोटी 88 लाख 50 हजार रुपये खर्च केले. विदेशी खेळाडूंमध्ये जर्मनीचा गोन्झालो पीलट सर्वाधिक किंमत मिळविणारा खेळाडू ठरला. त्याला 68 लाखाला तर नेदरलँड्सच्या जिप जान्सेनला 54 लाखला तामिळनाडू ड्रॅगन्सने खरेदी केले. दुसऱ्या दिवशी नेदरलँड्सच्या लार्स बाल्क व डुको टेल्गेनकँप यांना अनुक्रमे यूपी रुद्राजने 40 व तामिळनाडू ड्रॅगन्सने 36 लाखाला खरेदी केले.