व्हिक्टर अॅम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल
‘सूक्ष्म आरएनए’ शोधासाठी गौरव
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. यावर्षी व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. या दोन्ही अमेरिकन दिग्गजांनी ‘मायक्रो आरएनए’चा शोध लावला होता. या दोन्ही शास्त्रज्ञांचे कार्य सजीवांच्या उत्क्रांती आणि कार्यासाठी मूलभूतपणे महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन निवड समितीने केले आहे. अॅम्ब्रोस सध्या मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल विद्यापीठात नैसर्गिक विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. तर ऊवकुन हे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे संशोधनकार्य करत आहेत.
‘मायक्रो आरएनए’च्या शोधासाठी व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. हा एक लहान रेणू असून तो जनुकांच्या क्रियाकलापांचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये समान जीन्स असली तरी स्नायू आणि मज्जातंतू यासारख्या पेशींची कार्ये वेगवेगळी असतात. अॅम्ब्रोस आणि रुवकुन यांच्या सूक्ष्म आरएनएच्या शोधामुळे यासंबंधीचा एक नवीन मार्ग उघड झाला आहे.
हा शोध महत्त्वाचा का?
व्हिक्टर अॅम्ब्रोस यांनी सी. एलेगन्समध्ये विकासात्मक वेळेच्या अनुवांशिक नियंत्रणावर संशोधन केले आहे. जीव कसे विकसित होतात आणि कसे कार्य करतात हे समजून घेण्यासाठी हा शोध मूलभूतपणे महत्त्वाचा ठरत आहे. आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये समान जीन्स असूनही, स्नायू आणि चेतापेशींसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींची कार्ये वेगवेगळी असतात. जनुकांच्या नियमनामुळे पेशींना केवळ आवश्यक असलेल्या जनुकांचा वापर करण्यास अनुमती देते.