विभव कुमारांना पंजाबमध्ये महत्त्वाचे पद
दिल्लीतून पंजाबमध्ये पोहोचले केजरीवालांचे निकटवर्तीय
वृत्तसंस्था/ चंदीगड
विभव कुमार यांच्यावरून सध्या पंजाबचे राजकारण तापले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना स्वत:चे कनिष्ठ बंधू संबोधिणाऱ्या अरविंद केजरीवालांनी विभव कुमार यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. मान यांचे मुख्य सल्लागार म्हणून विभव कुमार काम पाहणार आहेत. पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या सरकारची लोकप्रियता सातत्याने कमी होत असून तेथे दोन वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी विभव कुमार यांना राज्यात आणले गेल्याची चर्चा आहे.
विभव कुमार आता पंजाब सरकारमध्ये केजरीवालांच्या कल्पनांना अंमलात आणणार आहेत. विभव कुमार यांच्या नियुक्तीवरून पंजाब सरकारकडून कुठलीच औपचारिक पुष्टी करण्यात आलेली नाही. परंतु त्यांच्या नियुक्तीच्या चर्चेवरूनच गदारोळ निर्माण झाला आहे. आप खासदार स्वाति मालिवाल यांनी विभव कुमार यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मला मारहाण केल्यामुळेच केजरीवालांनी स्वत:च्या लाडक्या गुंडाला मोठे इनाम दिले असल्याची टीका स्वाति मालिवाल यांनी केली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार हे महत्त्वाचे पद आहे. पंजाब पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव आता गुंडाला उत्तरदायी असणार आहेत. पंजाबचे प्रतिभावंत युवा देश सोडून जात असताना राज्यात गुंडांना लाखो रुपयांचे वेतन, गाड्या-बंगले आणि नोकर देण्यात आले आहेत अशी उपरोधिक टीका मालिवाल यांनी केली.
आम आदमी पक्षाचे वरिष्ठ खासदार एन.डी. गुप्ता यांना शासकीय बंगल्यातून हाकलत गुंडाला तेथे वसविण्यात आले आहे. हा गुंड या घरात अवैध स्वरुपात राहत आहे. गुंड पंजाब सरकार चालवत असतील तर पंजाबच्या महिला सुरक्षित कशा राहणार? एका मुख्यमंत्र्याने स्वत:ला अशाप्रकारचा रबर स्टॅम होऊ देऊ नये असे मालिवाल यांनी भगवंत मान यांना उद्देशून म्हटले आहे.
काँग्रेसकडूनही लक्ष्य
विभव कुमार यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसचे आमदार परगट सिंह यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्री मान यांनी प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. दिल्लीतून विभव कुमार यांना मुख्यमंत्र्यांचा मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे का ? विभव कुमार यांना हा अधिकार अरविंद केजरीवालांच्या निर्देशावर अवैध स्वरुपात देण्यात आला आहे का प्रश्नाचे उत्तर मान यांनी द्यावे असे परगट सिंह यांनी म्हटले आहे.