स्टारलिंकच्या आधीच व्हायसॅटचा प्रवेश?
पीएसयू टेलिकॉमसह उपग्रह सेवा सुरु होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेची उपग्रह संप्रेषण कंपनी व्हायसॅट आता भारतात आपली सेवा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दिग्गज उद्योगपती एलान मस्क यांची स्टारलिंक कंपनी देखील भारतात आपली सेवा सुरु करणार आहे. मात्र त्या अगोदरच व्हायसॅट दाखल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एका अहवालानुसार, व्हायसॅट भारतातील उपग्रह सेवांचा विस्तार विमान वाहतूक, सागरी, संरक्षण आणि खासगी व्यवसाय क्षेत्रात करणार असल्याचेही संकेत आहेत.
आपली सेवा सुरू करण्यासाठी व्हायसॅटने सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल कंपनी सोबत भागीदारी केली आहे. कंपनी बीएसएनएलच्या विद्यमान परवान्याअंतर्गत काम करेल आणि संयुक्तपणे डायरेक्ट-टू-डिव्हाइस (डी2डी) उपग्रह सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, व्हायसॅट सेवेद्वारे द्वि-मार्गी संदेशन सुविधा प्रदान केली जाणार तसेच भविष्यात पूर्ण इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील जोडली जाणार आहे. या भागीदारीनंतर, बीएसएनएल उपग्रह संप्रेषण (सॅटकॉम) सेवा देणारी देशातील पहिली सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बनू शकते. भारताची कंपनी बीएसएनएल लवकरच उपग्रह संप्रेषण (सॅटकॉम) सेवा सुरू करणारी पहिली दूरसंचार कंपनी बनू शकते. प्राप्त वृत्तानुसार, ही सेवा अमेरिकन कंपनी व्हायसॅटसोबत भागीदारीत सुरू केली जाईल. भागीदारीअंतर्गत, व्हायसॅटच्या डायरेक्ट-टू-डिव्हाइस तंत्रज्ञानामुळे गुगल पिक्सलसारख्या काही स्मार्टफोन्सना थेट उपग्रहांशी जोडता येईल.