प्रथम विजय आवश्यक, मग नेता ठरवू !
विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीनंतर खर्गे यांचे विधान, एकत्र निवडणूक लढविण्यावर चर्चा, नितीशकुमार नाराज ?
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विरोधी पक्षांनी निर्माण केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक येथे मंगळवारी पार पडली आहे. आधी आघाडीचा विजय होणे आवश्यक आहे. त्यानंतर नेता कोण हे ठरविता येईल, असे विधान बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. 31 डिसेंबरपर्यंत आघाडीतील सर्व पक्षांचे जागावाटप पूर्ण करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानंतर 30 जानेवारीपासून संयुक्त सभा होतील, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, यावर अधिकृत भाष्य करण्यात आले नाही. मंगळवारच्या बैठकीत खासदारांच्या निलंबनासंबंधीही चर्चा करण्यात आली. तथापि, बैठकीनंतर काही मोठ्या नेत्यांची नाराजीही दिसल्याचे वृत्त आहे.
सर्वांनी मिळून एकत्र काम करण्यावर बैठकीत जोर देण्यात आला. या प्रस्तावाला सर्व पक्षांची मान्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जागावाटपाच्या अंतिम कालावधीवर मात्र निश्चित माहिती मिळू शकली नाही. तृणमूल काँग्रेसने 31 डिसेंबरपर्यंत जागावाटप पूर्ण करण्यावर जोर दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ब्
विरोधकांचा ‘चेहरा’ कोण ?
विरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार या प्रश्नाचे निश्चित उत्तर या बैठकीतून मिळालेले नाही, असे दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचविल्याची चर्चा होती. तथापि, त्यावर अधिकृतरित्या भाष्य करण्यात आले नाही. खर्गे यांनी मात्र, नेतानिवडीचा प्रश्न निवडणुकीचा परिणाम समोर आल्यानंतरच सोडविला जाईल. प्रथम विजय मिळविणे आवश्यक आहे, असे वक्तव्य पत्रकारांसमोर केले. त्यामुळे नेतानिवडीच्या प्रश्नावर नेमके काय ठरले हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अशी माहिती बैठकीनंतर विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
निलंबनावर आवाज उठविणार
संसदेतून विरोधी पक्षांच्या 140 हून अधिक खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार लोकाशाही धोक्यात आणत आहे. केंद्राच्या या दडपशाहीच्या विरोधात 21 डिसेंबरला देशव्यापी आंदोलन करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. हे आंदोलन विरोधी पक्ष एकत्रितरित्या करणार आहेत, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
28 पक्षांची उपस्थिती
या बैठकीला 28 विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, संयुक्त जनता दल, उद्धव ठाकरे गट, द्रविड मुन्नेत्र कळघम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल या पक्षांचे सर्वोच्च नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, सीताराम येच्युरी, राहुल गांधी, सोनिया गांधी, एम. के. स्टॅलिन असे मोठे नेते या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.
नितीश कुमारांची नाराजी ?
संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांची नाराजी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते आणि लालू प्रसाद यादव बैठक पूर्ण होण्याआधीच निघून गेले. बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेलाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सारे काही अलबेल आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांची नाराजी पंतप्रधानपदाच्या उमेदवारासंबंधी आहे, अशीही नंतर चर्चा होती. तथापि, नेत्याचे नाव ठरले नसल्याने गोंधळ मात्र प्रदर्शित झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजकपद मिळवून देत लालूप्रसाद यादव हे स्वत:चे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा करू पाहत होते, परंतु नितीश कुमारांना आघाडीत महत्त्वाचे पद न मिळाल्याने ते देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.
खर्गेंचे वक्तव्य
बैठकीत सर्व नेत्यांनी त्यांचे विचार मांडले. सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामेरे जाण्यावर भर दिला. केंद्रातील भाजप-रालोआ सरकार लोकशाहीचा अवमान करीत आहे. खासदारांचे मनमानी पद्धतीने निलंबन केले जात आहे. या विरोधात आम्ही एकत्र लढा देणार आहोत. त्यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. नेता निवडीचा प्रश्न नंतरचा आहे. प्रथम प्राधान्य निवडणूक एकत्र लढविण्याला आहे, असे छोटेखानी वक्तव्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीनंतर केले.
राज्यस्तरावर होणार जागावाटप
इंडिया आघाडीमध्ये जागावाटप राज्यस्तरावर होणार आहे. यानुसार एखाद्या राज्यात फॉर्म्युला न ठरल्यास आम्ही सर्व मिळून याप्रकरणी निर्णय घेणार आहोत. दिल्ली आणि पंजाबचा मुद्दा कसा सोडविण्यात यावा यावर पुढील काळात विचारविनिमय केला जाणार आहे. पंजाबसारख्या राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीच्या राज्यांबद्दल निर्णय पुढील टप्प्यात घेण्यात येईल असे खर्गे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
अपेक्षा काय होती ?
जवळपास तीन महिन्यांनंतर विरोधी आघाडीची बैठक झाली आहे. या बेठकीत लोकसभा निवडणुकीत काय करायचे, याची रुपरेषा ठरविण्यात येईल, अशी आधी चर्चा होती. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार आघाडीचा चेहराही या बैठकीत ठरविला जाणार होता. जागावाटपालाही आकार दिला जाणार होता. तथापि, अधिकृत वृत्तांतानुसार तरी यापैकी काहीही अद्याप न ठरल्याचे दिसत आहे. किंवा ठरले असेल तरी ते घोषित करण्यात आलेले नाही, असेच स्पष्ट होत आहे.
बॉक्स
एकत्र मिळून निवडणूक लढणार
ड विरोधी आघाडीच्या बैठकीत एकत्र मिळून लढण्यावर देण्यात आला भर
ड 31 डिसेंबरपर्यंत जागावाटप पूर्ण करा : आघाडीतील काही पक्षांची सूचना
ड 30 जानेवारीला पाटण्यात आघाडीची संयुक्त सभा आयोजित होणे शक्य
ड देशात 8 ते 10 ठिकाणी आघाडीच्या संयुक्त सभा