ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे निधन
वार्ताहर/ बेंगळूर
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे शुक्रवारी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. नेलमंगल येथील एका खासगी रुग्णालयात 85 वर्षीय अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या पश्चात मुलगा विनोद राज आहे. नेलमंगल येथील कनिष्ठ महाविद्यालयासमोरील आंबेडकर मैदानात शनिवारी दुपारपर्यंत जनतेला पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.
1938 मध्ये दक्षिण कन्नडमधील बेलतंगडी येथे जन्मलेल्या लीलावती यांनी 50 वर्षे चित्रपटसृष्टीची सेवा केली. ज्येष्ठ दि. अभिनेते राजकुमार, विष्णूवर्धन यांच्यासारख्या कन्नड कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते. कन्नड, तामिळ आणि तेलुगू भाषेतील 600 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. लीलावती यांनी 953 मध्ये ‘चंचल कुमारी’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तुळू भाषेत काम केले.
लीलावती यांना ‘विवाह मडिनोडू’ आणि ‘संत तुकाराम’ या चित्रपटांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. कोंडा, महात्याग, भक्त कुंभार, शिपाई रामू आणि गेज्जे पूजा या चित्रपटांमधील अभिनयासाठी लीलावतींना राज्य पुरस्कार मिळाला आहे. 1999 मध्ये डॉ. लीलावती यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2008 मध्ये तुमकूर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती. लीलावती यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील मान्यवर, चाहते आणि राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.