मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी कुतूहल
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज काँग्रेस हायकमांडशी करणार चर्चा
बेंगळूर : राज्य राजकारणात मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे वृत्त असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी दोन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेला काँग्रेस हायकमांडकडून हिरवा कंदील मिळेल की लांबणीवर टाकणार, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. हायकमांडने संमती दिली तर यावेळी मंत्रिमंडळ पुनर्रचनेवेळी 7 ते 8 मंत्र्यांना ‘डच्चू’ देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकेल. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांनी लॉबिंग सुरू केले आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सिद्धरामय्या गुरुवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. दिल्ली दौऱ्यात ते मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी हायकमांडशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार मागील दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. सिद्धरामय्या दिल्लीत पोहोचल्यानंतर वेळ काढून उभय नेते हायकमांडसमोर मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा मांडणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेईल, याविषयी कुतूहल आहे. राज्यात काँग्रेस सत्तेवर येऊन दीड वर्ष उलटले आहे. सध्या मंत्रिमंडळ पुनर्रचना नको, असा सिद्धरामय्यांचा विचार असला तरी काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी पक्षातील नेत्यांमध्येच नाराजी आहे, त्यामुळे हायकमांडच्या मर्जीवर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या बाजूने असल्याचे समजते. जर हायकमांडने हिरवा कंदील दाखविला तर मधू बंगारप्पा, के. एन. राजण्णा, एच. सी. महादेवप्पा, डॉ. एम. सी. सुधाकर, डी. सुधाकर, आर. बी. तिम्मापूर यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदार बी. के. हरिप्रसाद, बेलूर गोपालकृष्ण, विनय कुलकर्णी, लक्ष्मण सवदी, सी. पी. योगेश्वर, के. वाय. नंजेगौडा, एच. सी. बालकृष्ण, बंगारपेठ नारायणस्वामी, विजयानंद काशप्पनवर, अजय सिंग हे मंत्रिपदासाठी इच्छुक असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बी. नागेंद्र यांना पुन्हा संधी?
महर्षि वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणामुळे बी. नागेंद्र यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करून घेण्याविषयी चर्चा आहे. परंतु, याविषयी अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. हायकमांडच्या निर्णयावर नागेंद्र यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
प्रदेशाध्यक्षपद दिल्यास मंत्रिपद सोडेन : के. एन. राजण्णा
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाविषयी मी यापूर्वीच सांगितले आहे. प्रदेशाध्यक्षपद दिल्यास मंत्रिपद सोडेन. प्रदेशाध्यक्षद दिल्यास मला मंत्रिपद नको, अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी डी. के. शिवकुमार यांनी त्यांचे मत मांडले आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काहीही निर्णय घ्यायचा असेल तर तो हायकमांड घेईल. याविषयी चर्चा होईल की नाही माहित नाही, असेही ते म्हणाले.
केपीसीसीला नवा सारथी?
मंत्रिमंडळ पुनर्रचनेबरोबरच कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चाही सुरू झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपदही सांभाळत आहेत. यापूर्वी शिवकुमार यांनीच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, हायकमांडच्या दबावामुळे ते या पदावर कायम राहिले. आता विधानसभेच्या पोटनिवडणुकाही संपल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्य काँग्रेससाठी नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याचा विचार हायकमांडचा विचार असल्याचे समजते. त्यामुळे सिद्धरामय्या व शिवकुमार याविषयी देखील वरिष्ठांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
वगळण्याची शक्यता असणारे...
मधू बंगारप्पा (प्राथमिक-माध्यमिक शिक्षण खाते), के. एन. राजण्णा (सहकार), डॉ. एम. सी. सुधाकर (उच्च शिक्षण), डॉ. एच. सी. महादेवप्पा (समाजकल्याण), डी. सुधाकर (योजना व सांख्यिकी), आर. बी. तिम्मापूर (अबकारी).
मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार...
आमदार बी. के. हरिप्रसाद, बेलूर गोपालकृष्ण, विनय कुलकर्णी, लक्ष्मण सवदी, सी. पी. योगेश्वर, के. वाय. नंजेगौडा, एच. सी. बालकृष्ण, बंगारपेठ नारायणस्वामी, विजयानंद काशप्पनवर, अजय सिंग.