भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र सिंह राणांचे निधन
जम्मू-काश्मीर विधानसभेचे होते सदस्य
वृत्तसंस्था/ जम्मू
अलिकडेच आमदार म्हणून निवडून आलेले भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र सिंह राणा यांचे निधन झाले आहे. 59 वर्षीय राणा यांनी फरीदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. राणा यांनी अलिकडेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नगरोटा मतदारसंघात विजय मिळविला होता. तसेच राणा यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली जाणार होती. राणा हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे बंधू होते. देवेंद्र सिंह यांच्या निधनावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शोक व्यक्त केला आहे.
राणा हे जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय व्यक्ती होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भाजप तसेच त्यांच्या समर्थकांना धक्का बसला असल्याचे भाजपचे प्रवक्ते साजिद युसूफ यांनी म्हटले आहे. तर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
राणा हे भाजपपूर्वी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षात होते. तसेच ते उमर अब्दुल्ला यांचे निकटवर्तीय होते. उमर अब्दुल्ला हे मागील वेळी मुख्यमंत्री असताना राणा हे त्यांचे सल्लागार होते. जम्मू क्षेत्रातील प्रभावी वक्ते म्हणून त्यांना ओळखले जात होते.