आश्वासने, हमी योजनांवरून कानपिचक्या
मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर पंतप्रधान मोदींकडूनही खरपूस समाचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणुकीतील आश्वासनांबाबत पक्षनेत्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी काँग्रेस नेत्यांवर जोरदार शाब्दिक प्रहार केला. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शुक्रवारी भाष्य करताना ‘काँग्रेसला आता हे समजू लागले आहे की खोटी आश्वासने देणे सोपे आहे, परंतु त्यांची योग्य अंमलबजावणी करणे कठीण किंवा अशक्मय आहे’ असे लिहिले आहे. पंतप्रधानांच्या या भाष्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 31 ऑक्टोबर रोजी बेंगळूरमधील एका कार्यक्रमात बोलताना, ‘आपण पूर्ण करता येतील अशीच आश्वासने दिली पाहिजेत, अन्यथा येणाऱ्या पिढीकडे बदनामीशिवाय काहीच उरणार नाही.’ असे वक्तव्य केले होते.
कर्नाटकातील हमी योजनांबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. खोटी आश्वासने देणे सोपे आहे, पण त्यांची योग्य अंमलबजावणी करणे अवघड किंवा अशक्मय असल्याचे काँग्रेस पक्षाला चांगलेच समजले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पाच्या आधारेच घोषणा कराव्यात, अन्यथा राज्यात दिवाळखोरी माजेल, असे खर्गे कर्नाटकात म्हणाले होते. त्यानंतर खर्गे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत पंतप्रधानांनी खोट्या आश्वासनांवरून काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्याशिवाय कर्नाटकाच्या बाबतीत बोलताना, काँग्रेस पक्ष विकासाऐवजी पक्षांतर्गत राजकारण आणि लुटमारीत व्यस्त आहे. एवढेच नाही तर सध्याच्या योजनाही ते मागे घेणार आहेत, असेही मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या या आरोपानंतर काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी कर्नाटकातील सरकार सर्व आश्वासने पूर्ण करत असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसशासित राज्यांमधील स्थिती बिकट : पंतप्रधान
निवडणुकीच्या काळात काँग्रेस सतत प्रचारातून जनतेला आश्वासने देत असते. मात्र, ही आश्वासने ते कधीच पूर्ण करू शकणार नाहीत याची जाणीव आता लोकांनही होऊ लागली आहे. आज हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या काँग्रेसची सत्ता असलेल्या कोणत्याही राज्याकडे पाहिल्यास विकासाचा वेग आणि आर्थिक पत पूर्णपणे खराब होत चालल्याचे स्पष्टपणे दिसून येते असे पंतप्रधान म्हणाले. हिमाचल प्रदेशात सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. तेलंगणातील शेतकरी आश्वासनानुसार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. यापूर्वी छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांनी असे काही भत्ते देण्याचे आश्वासन दिले होते, ज्यांची पाच वर्षे अंमलबजावणी झाली नाही. काँग्रेस कशी चालते याची अनेक उदाहरणे असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. खोट्या घोषणांमुळे गरीब, तऊण, शेतकरी आणि महिला यांना आश्वासनांचा लाभ तर मिळत नाहीच, पण त्यांच्या सध्याच्या योजनाही कमकुवत होत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.