ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड
बॉलिवुडवर शोककळा, आज पार्थिवावर अंत्यसंस्कार
प्रतिनिधी / ► मुंबई
भारतकुमार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी ऊग्णालयात निधन झाले, ते 87 वर्षांचे होते. मुलगा कुणाल गोस्वामी यांनी त्यांच्या निधन वृत्ताला दुजोरा दिला. मनोज कुमार प्रदीर्घ काळ प्रकृतीशी झुंज देत होते. दरम्यान मनोज कुमार यांचे पार्थिव त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार असून शनिवारी पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कुणाल यांच्या म्हणण्यानुसार अखेरच्याक्षणी मनोज कुमार यांनी कोणताही त्रास दिला नाही. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, तसेच ते गेल्या काही महिन्यांपासून यकृताच्या जखमेवर उपचार घेत होते. हा त्रास अधिक वाढल्याने 21 फेब्रुवारी रोजी त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मनोज कुमार हे भारत कुमार म्हणून ओळखले जातात ते त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांती’ आणि ‘रोटी, कपडा और मकान’ सारखे चित्रपट विशेष हिट ठरले. मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.
मनोज कुमार फाळणीमुळे भारतात
मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये झाला. त्यांचे कुटुंबिय फाळणीमुळे भारतात आले. ते राजस्थान येथील हनुमानगढ जिह्यात स्थायिक झाले. दिल्लीत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अभिनयाच्या प्रेमामुळे मुंबईकडे वाटचाल केली. दिलीप कुमार काम करत असलेल्या शबनम चित्रपटात त्यांना पहिली भूमिका मिळाली. या चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज होते. हेच नाव त्यांनी चित्रपटसृष्टीत वापरून किमया केली.
देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला : मुख्यमंत्री
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसफष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.