पद्मनाभस्वामी मंदिरातून पात्राची चोरी, 4 जणांना अटक
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातून कांस्याचे पात्र चोरल्याप्रकरणी हरियाणातून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या पारंपरिक पात्राला स्थानिक भाषेत उरुली या नावाने ओळखले जाते. याचा वापर जुन्या काळात पूजा करण्यासाठी केला जात होता. लोक हे पात्र तळघरांमध्ये ठेवायचे.
आरोपींची ओळख पटविण्यात आली असून हरियाणा पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली आहे. आरोपींपैकी एक जण डॉक्टर असून त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व आहे. या आरोपीने 3 महिलांच्या एका समुहासोबत मागील आठवड्यात मंदिराला भेट दिली होती. त्यांनी गुरुवारी मंदिरातून पात्राची चोरी केली होती असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मंदिरातून पात्र गायब झाल्यावर मंदिर व्यवस्थापकांनी पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना शोधून काढले. आरोपींना स्थानिक पोलिसांच्या मदतीने हरियाणात शोधण्यात आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींना तिरुअनंतपुरम येथे आणले जाणार आहे. या मंदिरात पोलिसांचा सदैव पहारा असतो. सर्वात सुरक्षित मानण्यात येणाऱ्या मंदिरात चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.