उत्तराखंड बोगद्यात व्हर्टिकल ड्रिलिंगही सुरू; बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण
उत्तराखंड बोगद्यात व्हर्टिकल ड्रिलिंगही सुरू : डोंगरावरून मार्ग तयार करून कामगारांना बाहेर काढण्याची तयारी
वृत्तसंस्था/ उत्तरकाशी
उत्तरकाशीच्या सिलक्मयारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी शुक्रवारपासून थांबलेले बचावकार्य रविवारी पुन्हा सुरू झाले आहे. आता कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून लंबरेषेत (व्हर्टिकल) खोदकाम केले जात आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर रविवारी दुपारपासून पर्यायी मार्ग खोदाईचे कामकाज सुरू झाले आहे. तसेच आता बचाव मोहिमेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असून त्यांची स्वतंत्र यंत्रणा आणि सैन्यबळही रविवारी दुर्घटनास्थळी दाखल झाले.
उत्तरकाशीच्या सिलक्मयारा बोगद्यात 15 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. बचावकार्यात नवीन अडचणी निर्माण होत आहेत. बोगद्यात ड्रिलिंग मशीन अडकल्याने बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या लवकरच बाहेर पडण्याच्या आशा मावळल्या आहेत. बचावासाठी आता बराच वेळ लागू शकतो. बोगद्यात अडकलेले ऑगर मशीनचे भाग काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, दोन-तीन पर्यायांवरही काम सुरू झाले आहे.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचू न शकल्याने प्लॅन बी अंतर्गत व्हर्टिकल ड्रिलिंगचे नियोजन करण्यात आले. हे काम सतलज विद्युत निगम लिमिटेडद्वारे केले जात आहे. यापूर्वी, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) च्या सैनिकांनी झाडे तोडून अवजड यंत्रसामग्री डोंगराच्या माथ्यावर नेण्याचा मार्ग तयार केला होता. लंबरेषेतील ड्रिलिंग अंतर्गत डोंगरात वरपासून खालपर्यंत एक मोठे छिद्र करून एक मार्ग तयार केला जाईल. मात्र, खोदकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात खडक-मातीचा ढिगारा पडण्याची शक्मयता असल्याने यात मोठा धोका आहे. ड्रिलिंगला किती वेळ लागेल, याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
मॅन्युअल ड्रिलिंगसाठी लष्कर दाखल
बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकन ऑगर मशीन वापरून रेस्क्मयू पाईप्स टाकण्याच्या कामात अडथळे येत असल्याने बचावकार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारी सदर रेस्क्यू पाईप्सचे काम निर्धारित जागेपासून अवघ्या 10 मीटर अंतरावर असताना यंत्राचे ब्लेड तुटले. यंत्रातील बिघाडामुळे बचावकार्य थांबवावे लागले. आता मशिनऐवजी मॅन्युअल ड्रिलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मॅन्युअल ड्रिलिंगसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. मॅन्युअल ड्रिलिंग करण्यापूर्वी ऑगर मशीनचे अडकलेले शाफ्ट आणि ब्लेड काढून टाकणे आवश्यक आहे. यंत्राचे तुकडे काळजीपूर्वक काढले नाहीत तर बोगद्यात टाकलेली पाईपलाईन फुटू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. आता पुढील कामकाज अधिक सुकर होण्यासाठी हैदराबाद येथून प्लाझ्मा कटर आणण्यात आले आहे.
21 नोव्हेंबरपासून सिलक्यारा बाजूकडून बोगद्यात खोदण्याचे काम सुरू होते. या कामात प्रगती साधत 60 मीटर भागापैकी 47 मीटर पाईप ड्रिलिंगद्वारे टाकण्यात आले. अडकलेल्या कामगारांपर्यंत जाण्यासाठी सुमारे 10-12 मीटर अंतर बाकी होते, मात्र शुक्रवारी सायंकाळी ड्रिलिंग मशिनसमोर लोखंडी वस्तू आल्याने ड्रिलिंग मशीनचा शाफ्ट अडकला. हा शाफ्ट अजूनही तिथेच अडकून पडला आहे. ते मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे काढला जाईल. अडकलेला शाफ्ट काढण्यासाठी मॅन्युअल ड्रिलिंग करताना पाईपमध्ये फक्त एकच व्यक्ती जाऊन खोदकाम करू शकतो. त्यामुळे हे करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. सदर मार्गातील शाफ्ट व लोखंडी सळ्या व पत्रे काढल्यानंतर पुढील खोदाई करून रिस्क्यू पाईप घातले जाणार आहेत.
कामगारांच्या कुटुंबीयांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी रविवारी सिलक्मयारा बोगद्यात अडकलेल्या चंपावत जिल्ह्यातील टनकपूर येथील ऐरी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. सध्या सरकारकडून अडकलेल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकदीने काम केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कामगारांना बाहेर काढण्यासाठी केंद्रीय यंत्रणा आणि राज्य प्रशासन करत असलेल्या अथक प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. सर्व कामगार निरोगी असून त्यांना लवकरच बाहेर काढण्यात येईल, असेही त्यांनी कुटुंबियांना सांगितले. अडकलेल्या कामगारांमध्ये झारखंडमधील 15, उत्तर प्रदेशातील आठ, बिहार आणि ओडिशामधील प्रत्येकी पाच, पश्चिम बंगालमधील तीन, आसाममधील दोन आणि हिमाचल प्रदेशातील एक कामगार आहे.