शर्यत जिंकली व्हर्स्टापेनने, वर्ल्ड चॅम्पियन ठरला लँडो नोरिस
अबु धाबी फॉर्मुला वन ग्रां प्रि : मॅक्लारेनच्या नोरिसची पहिलीच वर्ल्ड चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ अबू धाबी
मॅक्लारेनचा ड्रायव्हर लँडो नोरिसने फॉर्मुला वनचे पहिल्यांदाच जेतेपद मिळवित रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनची चार वर्षाची मक्तेदारी संपुष्टात आणली. व्हर्स्टापेनने अबु धाबी ग्रां प्रि शर्यतीचे जेतेपद मिळविले तर लँडो नोरिसने तिसरे स्थान मिळवित व्हर्स्टापेनवर दोन गुणांची आघाडी घेत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. मॅक्लारेनच्याच ऑस्कर पियास्ट्रीने दुसरे स्थान मिळविले. वेशेष म्हणजे मॅक्लारेनने कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिपही याच वर्षात ऑक्टोबरमध्ये जिंकली आहे. एकाच वर्षात दोन्ही चॅम्पियनशिप्स एकाच संघाने जिंकण्याची ही 1998 नंतरची पहिलीच वेळ आहे.
26 वर्षीय नोरिसने टेस्टिंग ड्रायव्हर म्हणून सुरुवात केली आणि नंतर रिझर्व्ह ड्रायव्हर म्हणून स्थान मिळवित आता चॅम्पियनशिप जिंकण्यापर्यंत मजल मारली. तो फॉर्मुला वनचा वर्ल्ड चॅम्पियन बनणारा ब्रिटनचा 11 वा ड्रायव्हर आहे. त्याने 11 एफ वन शर्यती जिंकल्या असून त्यातील पहिली शर्यत गेल्या वर्षी जिंकली होती. त्याला एकंदर क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले होते. पियास्ट्री देखील पहिला एफ वन टायटल जिंकण्याच्या शर्यतीत होता. पण अखेर त्याला ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नोरिसपेक्षा तो 13 गुणांनी मागे राहिला. पियास्ट्रीने या मोसमात सात शर्यती जिंकल्या आहेत. पण ऑगस्टनंतर त्याला एकही शर्यत जिंकता आली नाही. नोरिसने एकूण 423, व्हर्स्टापेनने 421 व पियास्ट्रीने 410 गुण मिळविले. यापूर्वी लेविस हॅमिल्टन 2020 मध्ये टायटल जिंकणारा ब्रिटनचा शेवटचा ड्रायव्हर होता.
व्हर्स्टापेनने या मोसमातील ही आठवी आणि कारकिर्दीतील एकूण 71 वी शर्यत जिंकली. येथील शर्यतीत फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने चौथे, मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने पाचवे, अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने सहावे, हासचा एस्टेबन ओकॉनने सातवे, फेरारीच्या लेविस हॅमिल्टनने आठवे, सॉबरच्या निको हुल्केनबर्गने नववे व अॅस्टन मार्टिनच्या लान्स स्ट्रोलने दहावे स्थान मिळविले.