कतार ग्रां प्रिमध्ये व्हर्स्टापेन विजेता
मॅक्लारेनचा पियास्ट्री दुसरा, विल्यम्सचा सेन्झ तिसरा
वृत्तसंस्था/ लुसेल, कतार
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या कतार ग्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीचे जेतेपद पटकावत चॅम्पियनशिप मिळविण्याच्या दिशेने चुरस निर्माण केली आहे.
सध्या ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये आघाडीवर असणाऱ्या मॅक्लारेनच्या लँडो नोरिसला पहिले एफ वन जेतेपद मिळविण्याची संधी होती. पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मॅक्लारेनचाच त्याचा संघसहकारी व जेतेपदाच्या शर्यतीत असणारा ऑस्कर पियास्ट्रीने दुसरे स्थान मिळविले तर विल्यम्सच्या कार्लोस सेन्झ ज्युनियरने तिसरे स्थान घेतले. जेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या तिघांनीही या मोसमात सात शर्यती जिंकल्या आहेत. व्हर्स्टापेन सलग पाचव्यांदा एफ वन टायटल जिंकण्यासाठी प्रयत्नशील असून पियास्ट्री व नोरिस पहिले जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. 15 वर्षांत पहिल्यांदाच तीन ड्रायव्हर्समध्ये जेतेपदाची चुरस लागली आहे. या मोसमातील एकच शर्यत बाकी असून अबु धाबीमध्ये 7 डिसेंबर रोजी यस मेरिना सर्किटवर होणाऱ्या शर्यतीनंतर जेता निश्चित होणार आहे.
व्हर्स्टापेनने कारकिर्दीतील 70 वी शर्यत जिंअली असून नोरिस हा लेविस हॅमिल्टननंतर जेतेपद मिळविणारा पहिला ब्रिटिश ड्रायव्हर होण्याच्या मार्गावर आहे. हॅमिल्टनने एकूण 7 चॅम्पियनशिप्स जिंकल्या होत्या, त्यातील शेवटचे 2020 मध्ये मिळविले होते. येथील शर्यतीत उतरण्याआधी नोरिस इतर दोघांपेक्षा 24 गुणांनी पुढे होता. पण त्याची ही आता कमी झाली असून तो आता व्हर्स्टापेनपेक्षा 12 तर पियास्ट्रीपेक्षा 16 गुणांनी पुढे आहे. पियास्ट्री आता चॅम्पियनशिपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे.
येथील शर्यतीत मर्सिडीजच्या एके अँटोनेलीने पाचवे, त्याचाच संघसहकारी जॉर्ज रसेलने सहावे, अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने सातवे, फेरारीच्या लेक्लर्कने आठवे, आरबीच्या लॉसनने नववे, रेडबुलच्या वाया. त्सुनोदाने दहावे स्थान मिळविले.