पायाने भरला भांगात सिंदूर
प्रेमात पडलेल्या व्यक्ती कोणत्याही आव्हानाला डरत नाहीत, अशी समजूत आहे. सर्वसामान्य लोक ज्या घटनांची कल्पनाही करु शकत नाहीत, अशा घटना प्रेमात पडलेली माणसे करतात. त्यांनी असे का केले, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. पण या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नसते, असा अनुभव येतो.
बिहारच्या दरभंगा येथील श्यामा माई मंदिरात असाच एक अद्भूत प्रेमविवाह नुकताच पार पडला आहे. या मंदिरातील मूर्ती कालिमातेची आहे. या मूर्तीसमोर एका वराने वधूच्या गळ्यात हार घातला. तसेच तिच्या भांगात सिंदूरही भरला. पण ही कृती त्याने हातांनी नव्हे तर पायाने केली. कारण वराला दोन्ही हात नाहीत. तरीही हाती-पायी धडधाकट असणाऱ्या वधूने त्याची निवड केली होती. लग्नाच्या वेळी वधू गुडघ्यावर बसली. नंतर वराने आपल्या पायाच्या बोटात हार पकडून तो तिच्या गळात घातला. तसेच पायाच्या बोटांनीच तिच्या भांगात सिंदूर भरला आणि हा विवाह पार पडला. या विवाहावर कौतुक मिश्रीत आश्रयाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वधूने अशा वराची निवड का केली असा प्रश्नही काहींना पडला आहे. तथापि वधू आपल्या निवडीवर समाधानी असून तिला या वराशीच संसार करण्याची इच्छा आहे. हा विवाह पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला असून सोशल मीडियावरही या विवाहाची दृष्ये अत्यंत लोकप्रिय होताना दिसत आहेत. वराचे नाव प्रदीप मंडल असे असून वधूचे नाव रिता असे आहे. हे दोघे गेली आठ वर्षे एकमेकांच्या संबंधात होते. त्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
प्रदीप मंडल याने 2008 मध्ये एका अपघातात आपले दोन्ही हात गमवले. तरीही त्याने निर्धाराने आपले शिक्षण पूर्ण केले. तो पदवीधर झाला पण सध्या बेरोजगार आहे. त्याची पत्नी रिता ही सुद्धा शिकलेली असून नोकरी करीत आहे. आता तिच्यावरच संसार आणि पती सांभाळण्याची जबाबदारी आहे.