व्हेरेव्ह, साबालेंका यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था / माद्रीद
माद्रीद मास्टर्स 1000 दर्जाच्या खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत रशियाचा टॉपसिडेड अॅलेक्सझांडेर व्हेरेव्ह तसेच महिलांच्या विभागात टॉपसिडेड साबालेंकाने एकेरीत विजयी सलामी देत तिसरी फेरी गाठली. व्हेरेव्हने अॅग्युटचा तर साबालेंकाने अॅना ब्लिनकोव्हाचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात व्हेरेव्हने अॅग्युटचे आव्हान 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. व्हेरेव्हने ही स्पर्धा 2015 आणि 2021 साली जिंकली होती. तसेच त्याने अलिकडच्या कालावधीत एकेरीतील सलग 6 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या स्पर्धेत पुनरागमन केलेल्या अमेरिकेच्या टेलर फ्रित्झने ब्रिटनच्या ओकोनेलचा 6-1, 6-4, रुमानियाच्या कास्पररुडने रिंडेरकिनेचचा 6-3, 6-4, अमेरिकेच्या बेन शेल्टनने मारियानो नेव्होनीचा 4-6, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात सेरुनडोलोने फेलिक्स अॅलिसीमेचा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. तर रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवला पुढील फेरीत चाल मिळाली कारण त्याचा प्रतिस्पर्धी डिजेरी याने दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याच प्रमाणे फ्रान्सच्या मोनफिल्सने आजारपणामुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या रशियाच्या रुबलेव्हला पुढे चाल मिळाली.
महिलांच्या विभागात टॉपसिडेड साबालेंकाने बिगर मानांकीत अॅना ब्लिनकोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. साबालेंकाच्या पुढील फेरीतील सामना इलेसी मर्टन्सबरोबर होणार आहे. अन्य एका सामन्यात पोटापोहाने आठव्या मानांकित झेंगचा पराभव केला. तसेच अमेरिकेच्या स्टीमेसने अॅनीसिमोव्हाचा 6-2, 2-6, 7-5, सहाव्या मानांकित जसमिन पाओलिनीने केटी बोल्टरचा 6-1, 6-2, जेसिका पेगुलाने इव्हा लीसचा 6-2, 6-2 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.