For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेरेव्ह, रुड, रायबाकिना, सित्सिपस, झेंग, गॉफ, कॅचेनोव्ह विजयी

06:58 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हेरेव्ह  रुड  रायबाकिना  सित्सिपस  झेंग  गॉफ  कॅचेनोव्ह विजयी
Advertisement

प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : राफेल नदाल, सुमित नागल, मिनेन, व्हिकेरी, कॉर्नेट यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम रेड क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक, इलिना रायबाकिना, अमेरिकेची कोको गॉफ आणि ट्युनेशियाची जेबॉर, चीनची सातवी मानांकित झेंग क्विनवेन यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित पुढील फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या विभागात जर्मनीचा अॅलेक्झांडर व्हेरेव्ह, ग्रीसचा सित्सिपस, रशियाचा कॅचेनोव्ह तसेच नॉर्वेचा कास्पर रुड यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदाल तसेच हंगेरीचा फ्युकसोव्हिक्स आणि भारताच्या सुमित नागलचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisement

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील झालेल्या सामन्यात जर्मनीच्या चौथ्या मानांकित व्हेरेवने स्पेनच्या माजी टॉप सिडेड आणि अनुभवी राफेल नदालचा 6-3, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. आतापर्यंत 14 वेळेला फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या राफेल नदालचे पुनरागमन निराशजणक झाले. तब्बल 20 वर्षे टेनिस क्षेत्रात आपल्या दर्जेदार खेळाचे दर्शन घडवित 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱ्या नदालला गेल्या काही दिवसांपासून वारंवार दुखापतीने चांगलेच दमविले. त्यामुळे त्याची टेनिस कारकिर्द आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या स्पर्धेतील नदालचा हा कदाचित शेवटचा सहभाग राहिल, असा अंदाज आहे. रोलाँ गॅरोच्या रेड क्लेकोर्टवर नदालला पराभूत करणारा व्हेरेव्ह हा तिसरा टेनिसपटू आहे. यापूर्वी या ठिकाणी सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविच आणि जर्मनीचा रॉबिन सोडरलिंग यांनी नदालला पराभूत केले होते.

नॉर्वेच्या कास्पर रुडने मंगळवारी पुरुष एकेरीमध्ये विजयी सलामी देताना ब्राझीलच्या अलव्हेसचे आव्हान संपुष्टात आणले. यापूर्वी दोन वेळेला या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या कास्पर रुडने अलव्हेसवर 6-3, 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये मात केली. या संपूर्ण सामन्यात रुडने बेसलाईन खेळावर अधिक भर दिला. रुडला विजयासाठी 2 तास कोर्टवर झगडावे लागले.

पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात माजी उपविजेता ग्रीसचा स्टिफॅनोस सित्सिपसने आपल्या या स्पर्धेतील मोहिमेला विजयाने प्रारंभ केला. नवव्या मानांकित सित्सिपसने हंगेरीच्या फ्युकसोव्हिक्सचा 7-6 (9-7), 6-4, 6-1, असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. 2024 च्या टेनिस हंगामात सित्सिपसने यापूर्वी माँटेकार्लो मास्टर्स स्पर्धा जिंकली होती.

रशियाच्या कॅरेन कॅचेनोव्हने भारताच्या सुमित नागलचा 6-2, 6-0, 7-6 (7-5) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. मागील वेळी भारताच्या सुमित नागलने ऑस्ट्रेलियाच्या बुबलिकचा पराभव करत या स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते. कॅचेनोव्ह आणि नागल यांच्यातील सामन्यावेळी पावसाचा अडथळा झाल्याने काही वेळ खेळ थांबवावा लागला होता.

स्वायटेक विजयी

महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने विजयी सलामी देताना लिओलिया जिनजेनचा 6-1, 6-2 असा एकतर्फी पराभव केला. 22 वर्षीय स्वायटेक ही क्लेकोर्टवरील स्पर्धेत तरबेज आणि चाणाक्ष महिला टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत स्वायटेकने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली असून आता ती चौथ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. स्वायटेकने अलिकडे माद्रिद आणि रोम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत.

चीनच्या सातव्या मानांकित झेंग क्विनवेनने 34 वर्षीय अॅलिझ कॉर्नेटचा 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. फ्रान्सच्या कॉर्नेटची घरच्या टेनिस कोर्टवरील ही शेवटची स्पर्धा आहे. यानंतर ती टेनिस क्षेत्रातून निवृत्त होत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वारंवार पावसामुळे काही सामने अर्धवट स्थितीत थांबवावे लागले.

अन्य एका सामन्यात कझाकस्तानच्या चौथ्या मानांकित इलिना रायबाकिनाने बेल्जियमच्या ग्रिट मिनेनचा केवळ 73 मिनिटांच्या कालावधीत 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. एप्रिलमध्ये झालेल्या स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेत रायबाकिनाने स्वायटेकचा उपांत्य फेरीत पराभव केला होता. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने विजयी सलामी देताना जर्मनीच्या ज्युलिया अॅव्हेडिव्हाचा 6-1, 6-1 असा सहज फडशा पाडला. गॉफला यापूर्वी एकदाही फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकता आलेली नाही. गॉफचा ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा 50 वा सामना होता. 2022 साली या स्पर्धेत गॉफला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. आता गॉफची दुसऱ्या फेरीत गाठ स्लोव्हेनियाच्या झिडानसेकशी होणार आहे.

जेबॉर दुसऱ्या फेरीत

झिडानसेकने पहिल्या फेरीतील सामन्यात बेल्जियमच्या अॅलिसन व्हॅन युटेव्हॅनिकचा 6-2, 2-6, 6-1 असा पराभव केला. ट्युनेशियाच्या आठव्या मानांकित जेबॉरने विजयी सलामी देताना अमेरिकेच्या वाईल्ड कार्डधारक साचिया व्हिकेरीचा 6-3, 6-2 असा पराभव केला. हा सामना जेबॉरने 81 मिनिटात जिंकला. गेल्या वर्षी या स्पर्धेत जेबॉरने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

Advertisement
Tags :

.