व्हेरेव्ह-मेदव्हेदेव उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / हॅले (जर्मनी)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या हॅले खुल्या ग्रासकोर्ट पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव्ह आणि रशियाचा मेदव्हेदेव यांच्यात एकेरीची उपांत्य लढत होईल.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात व्हेरेव्हने कोबोलीचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करुन शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत पाचव्यांदा उपांत्य फेरी गाठणारा व्हेरेव्ह हा पाचवा टेनिसपटू आहे. दुसऱ्या एका सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने अॅलेक्स मिचेलसन्सचा 6-4, 6-3 अशा फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत बुबलीक आणि कॅचेनोव्ह यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होईल. बुबलीकने इटलीच्या टॉपसिडेड सिनेरचा दुसऱ्या फेरीत पराभव केला होता तर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने टॉमस मॅकहेकचा 7-6 (7-5), 6-3 असा फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. कॅचेनोव्हने टॉमस इचेव्हेरीवर 6-3, 6-2 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे