व्हेरेव्ह, जोकोविच, साबालेंका, बेडोसा उपांत्य फेरीत
बोपन्ना-झांग यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान समाप्त, अल्कारेझ-कोको गॉफ यांना धक्का, टॉमी पॉल, पॅव्हेलचेंकोव्हाही पराभूत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत जर्मनीचा टॉपसिडेड अॅलेक्झांडर व्हेरेव्हने पुरुष एकेरीची सर्वप्रथम उपांत्यफेरी गाठताना अमेरिकेच्या टॉमी पॉलचा पराभव केला. तर महिलांच्या विभागात टॉपसिडेड आणि विद्यमान विजेती एरिना साबालेंकाने सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. अमेरिकेच्या टॉपसिडेड कोको गॉफचे आव्हान स्पेनच्या बेडोसाने संपुष्टात आणले तर पुरुष एकेरीमध्ये सर्बियाच्या माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचने स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली.
मंगळवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 7-6 (7-1), 7-6 (7-0), 2-6, 6-1 अशा चार सेट्समधील लढतीत पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत पुरुष विभागात उपांत्य फेरी गाठणारा व्हेरेव्ह हा पहिला टेनिसपटू बनला आहे. व्हेरेव्हने तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममध्ये त्याने आतापर्यंत दोनवेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. या सामन्यात टॉमी पॉलने व्हेरेव्हला कडवी लढत दिली. पहिले दोन सेटस् टायब्रेकरपर्यंत लांबले. पण व्हेरेव्हने आपल्या बेसलाईन खेळाच्या जोरावर ते दोन्ही सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सेटमध्ये टॉमी पॉलने आपली वेगवान सर्व्हिस शेवटपर्यंत राखत हा सेट जिंकला. पण चौथ्या सेटमध्ये टॉमी पॉलकडून विशेष प्रतिकार न झाल्याने व्हेरेव्हने हा सेट 6-1 असा जिंकून पॉलचे आव्हान संपुष्टात आणले. व्हेरेव्हने या स्पर्धेत हंबर्टला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता द्वितीय मानांकित व्हेरेव्ह आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. व्हेरेव्ह आणि जोकोविच यांच्यात उपांत्य फेरीत गाठ पडेल.
अल्कारेझ पराभूत
स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या 37 वर्षीय जोकोविचने पराभवाचा धक्का देत या स्पर्धेत 11 व्यांदा जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचने अल्कारेझचा 4-6, 6-4, 6-3, 6-4 अशा चार सेटमधील लढतीत पराभव केला. उभयतांमधील हा सामना 3 तास 37 मिनिटे चालला होता. जोकोविचने या स्पर्धेत 12 व्यांदा उपांत्यफेरी गाठली आहे. या विजयामुळे जोकोविचने ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विक्रमी 50 व्यांदा उपांत्यफेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टॉपसिडेड साबालेंकाने रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाचा 2-6, 6-2, 6-3 अशा सेटमध्ये पराभव करत उपांत्यफेरी गाठली. आता साबालेंका सलग तिसऱ्यांद या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मेलबोर्न पार्कच्या टेनिसकोर्टवर साबालेंकाने आता सलग 10 सामने जिंकले असून तिचा उपांत्यफेरीचा सामना स्पेनच्या 11 व्या मानांकित पावोला बेडोसा बरोबर होणार आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये साबालेंकाने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. तत्पूर्वी तिने गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. महिला टेनिस क्षेत्रामध्ये सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम मार्टिना हिंगीसने 1997 ते 1999 या कालावधीत केला होता.
गॉफ स्पर्धेबाहेर
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या टॉपसिडेड कोको गॉफचे आव्हान स्पेनच्या बेडोसाने सरळ सेटमध्ये संपुष्टात आणले. स्पेनच्या 11 व्या मानांकित बेडोसाने तृतिय मानांकित कोको गॉफचा 7-5, 6-4 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 2025 च्या टेनिस हंगामात प्रवेश करताना गॉफने सलग 9 एकेरी सामने जिंकले होते. पण आता तिची ही घोडदौड बेडोसाने रोखली. गॉफने 2023 साली आपल्या वयाच्या 20 व्या वर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. 27 वर्षीय बेडोसा आता ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत लढत देणार आहे. तिचा उपांत्य फेरीचा सामना साबलेंकाशी होणार आहे.
बोपन्ना-झांग यांचे आव्हान समाप्त
मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याची चीनची साथीदार शुआइ झांग यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे मिश्र दुहेरीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि ओलीव्हिया गॅडेसेकी यांनी बोपन्ना आणि झांग यांचा 2-6, 6-4, 11-9 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 70 मिनिटे चालला होता. या लढतीत बोपन्ना आणि झांग यांनी पहिला सेट 6-2 असा जिंकून आघाडी घेतल्यानंतर वादळीवारा वाहणाऱ्या वातावरणात त्यांना पुढील दोन सेट गमवावे लागले.