व्हेरेव्हची वाटचाल उपांत्य फेरीकडे
वृत्तसंस्था / ट्युरीन
2024 च्या टेनिस हंगामाअखेर येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्सझॅन्डर व्हेरेव्हने स्पेनच्या अव्वल कार्लोस अल्कारेझचा पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली. या पराभवामुळे अल्कारेझचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
दोनवेळा यापूर्वी एटीपी फायनल्स स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या जर्मनीच्या व्हेरेव्हने अल्कारेझचा 7-6(7-5), 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली. व्हेरेव्हने आपल्या गटातून यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकत आघाडीचे स्थान राखले आहे. व्हेरेव्हने यापूर्वी या स्पर्धेत रशियाच्या आठव्या मानांकित रुबलेव्हचा तसेच नॉर्वेचा सहावा मानांकित कास्पर रुडचा पराभव केला. आता रुबलेव्हचा पुढील सामना रुड बरोबर होणार असून रुबलेव्हने या लढतीत सरळ सेटस्मध्ये पराभव केला तर अल्कारेझला उपांत्यफेरी गाठण्याची संधी मिळू शकेल. व्हेरेव्हचा या स्पर्धेत जॉन न्युकाँब गटात समावेश करण्यात आला आहे. व्हेरेव्हचा पुढील सामना अमेरिकेच्या टेलर फ्रिजबरोबर होणार आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीत अल्कारेझने व्हेरेव्हला पराभूत करुन जेतेपद मिळविले होते. या पराभवची परतफेड व्हेरेव्हने एटीपी फायनल्स स्पर्धेत केली.