गौतम गंभीर, ओव्हल क्युरेटर यांच्यात शाब्दिक चकमक
वृत्तसंस्था/ लंडन
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे मंगळवारी ओव्हलचे मुख्य क्युरेटर ली फोर्टिस यांच्याबरोबरच्या जोरदार शाब्दिक चकमकीत अडकले आणि ग्राऊंडस्टाफकडे बोट दाखवत त्यांना ‘आम्ही काय करायला हवे ते तुम्ही आम्हाला सांगू नका’, असे सांगताना ऐकले गेले.
ओव्हलवर गुऊवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होणार आहे. मँचेस्टरमध्ये चौथा सामना अनिर्णीत राखताना उल्लेखनीय पुनरागमन केल्यानंतर दोन दिवसांतच भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक म्हणाले की, पाहुण्या संघाला खेळपट्टीपासून 2.5 मीटरांवर उभे राहण्यास सांगण्यात आल्यानंतर हा वाद झाला. तथापि, त्यांनी सांगितले की, भारतीय संघ कोणतीही तक्रार दाखल करणार नाही.
‘प्रामाणिकपणे सांगायचे, तर ग्राउंडस्टाफमधील एकाने येऊन सांगितले की, आम्ही खेळपट्टीपासून 2.5 मीटर अंतरावर उभे राहून दोरीच्या बाहेरून खेळपट्टी पाहणे आवश्यक होते. मी असे कधीही पाहिलेले नाही’, असे कोटक यांनी नंतर माध्यमांना सांगितले. यासाठी कोणत्याही तक्रारीची आवश्यकता नाही, असे त्यांनी पुढे सांगितले. कोटक म्हणाले की, भारतीय संघातील सदस्यांनी स्पाइक्स घातले नव्हते. त्यामुळे खेळपट्टीच्या पृष्ठभागाला धोका पोहोचण्याची कोणतीही शक्यता नव्हती. या सामन्यापूर्वी आम्हाला कल्पना होती की, क्युरेटर ही सोबत काम करण्याच्या दृष्टीने सोपी व्यक्ती नाही. पझेसिव्ह असणे चांगले आहे, पण जास्त असता कामा नये. आमच्याकडे जॉगर्स होते आणि स्पाइक्स नव्हते, त्यामुळे कोणताही धोका नव्हता, असे त्यांनी सांगितले.
कोटकनी केला हस्तक्षेप
सराव सत्रादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे की, गंभीर क्युरेटरशी शाब्दिक बाचाबाची करत आहेत, ज्यामुळे कोटकना हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करणे भाग पडले. फोर्टिसनी ‘मला याची तक्रार करावी लागेल’ असे गंभीरना सांगितले तेव्हा वाद सुरू झाला. त्यावर भारतीय मुख्य प्रशिक्षकांनी अगदी संक्षिप्तपणे उत्तर देताना ‘तुम्ही जा आणि तुम्हाला जी काही तक्रार करायची आहे ती करा’, असे बजावले. या टप्प्यावर कोटकनी हस्तक्षेप केला आणि इंग्लंडच्या क्युरेटरला बाजूला नेत सांगितले की, आम्ही काहीही नुकसान करणार नाही.
बॉलिंग कोच मॉर्न मॉर्केल आणि असिस्टंट कोच रायन टेन डुशेटसारखे इतर भारतीय सपोर्ट स्टाफ हा वाद लक्षपूर्वक ऐकत होते. जरी दोघांमध्ये वाद नेमका का झाला हे स्पष्ट झाले नसले, तरी गंभीर आणि फोर्टिस हे सरावासाठीच्या खेळपट्ट्यांच्या परिस्थितीवरून वाद घालत असल्याचे दिसून आले. तथापि गंभीरनी पुन्हा एकदा फोर्टिसना सांगितले की, त्यांनी त्यांच्या संघाला काय करावे हे सांगू नये. ‘तुम्ही आम्हाला काय करावे हे सांगू शकत नाही. तुम्ही फक्त ग्राउंड्समनपैकी एक आहात, त्यापलीकडे काहीही नाही’, असे गंभीर यावेळी सांगताना दिसून आले. त्यानंतर फोर्टिस आणि गंभीर आपापल्या मार्गाने गेले. भारताचे प्रशिक्षक मग नेट सेशन पाहण्यासाठी परतले. नंतर मैदानातून आपल्या कक्षात जाताना फोर्टिस म्हणाले, हा एक मोठा सामना आहे आणि ते (गंभीर) थोडेसे हळवे झाले आहेत.
दरम्यान, मँचेस्टर कसोटीत पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात खातेही न उघडणारा साई सुदर्शन हा सरावासाठी मैदानावर पोहोचणारा पहिला खेळाडू होता. तिथे डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव देखील गोलंदाजी टाकताना दिसला. त्याचप्रमाणे डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मॉर्केल यांच्या देखरेखीखाली गोलंदाजी करताना दिसला.