कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार सेठ-नगरसेवक जिरग्यागोळ यांच्यात शाब्दिक चकमक

06:45 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदारांनी नगरसेवकाला कडक शब्दात सुनावले : अनुसूचित जाती जनगणनेवेळी शिष्टाचाराचा भंग झाल्याचा आरोप

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

अनुसूचित जाती जनगणना सर्वेक्षणाच्या शुभारंभावरून भाजपचे नगरसेवक संदीप जिरग्यागोळ आणि आमदार राजू सेठ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सोमवारी सदाशिवनगर येथे हा प्रकार घडला असून या प्रकाराची दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.

राज्य सरकारच्या आदेशानुसार अनुसूचित जाती जनगणना महापालिकेच्यावतीने  सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचा शुभारंभ सदाशिवनगर येथील माजी महापौर सविता कांबळे यांच्या घरापासून केला जाणार होता. त्यानुसार त्याठिकाणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

जनगणना करण्यासाठी मोबाईलमध्ये अॅप देण्यात आले आहे. मात्र माजी महापौर सविता कांबळे यांच्या घराजवळ मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड झाले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दुसऱ्या घरापासून सर्वेक्षणाला सुरुवात केली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेले नगरसेवक संदीप जिरग्यागोळ यांनी महापालिका उपायुक्त उदयकुमार तळवार यांना चढ्या आवाजात बोलत वाद घातला. आमदारांचे ऐकून राजकारण करता, असे म्हणत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यावेळी आमदार राजू सेठ यांनी अधिकाऱ्यांसोबत मोठ्या आवाजात कशाला बोलता, असे म्हणत नगरसेवकांना धारेवर धरले.

तांत्रिक कारणामुळे माजी महापौर सविता कांबळे यांच्या घरापासून सर्वेक्षण सुरू करता आले नाही, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. मात्र आमदारांसोबत वाद घालण्यासह नगरसेवक जिरग्यागोळ यांनी अधिकाऱ्यांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. मात्र प्रत्येकवेळी राजकारण आणि निलंबित करा म्हणणे म्हणजे काय? सर्वेक्षणाला महापौर, उपमहापौर व इतर सर्वांनी चालना दिली आहे, असे राजू सेठ यांनी नगरसेवकाला सुनावले. वादावादीनंतर उपस्थित महापौर, उपमहापौर व इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. त्यानंतर आमदार सेठ तेथून निघून गेले. मात्र या प्रकाराची सोमवारी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article