Solapur : दाजी पेठेत व्यंकटेश्वर ब्रह्मोत्सवाचा मंगल समारोप; भक्तांची मोठी उपस्थिती
तिरुपतीच्या धर्तीवर साजरा झालेला व्यंकटेश्वर ब्रह्मोत्सव संपन्न
सोलापूर : पूर्व भागातील दाजी पेठेतील श्री व्यंकटेश्वर देवस्थानात गत सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाचा सोमवारी समारोप झाला. शेवटच्या दिवशी चक्ररनान, सूर्यप्रभा वाहनसेवा, चंद्रप्रभा वाहनसेवा, ध्वजपट अवरोहण आदी विधी पार पडले. या देवस्थानात बुधवार, २९ ऑक्टोबरपासून ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर दाजी पेठ येथील व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रम्होत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
यंदा ब्रह्मोसवाचे ५३ वे वर्ष आहे. ब्रह्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सकाळी ७.३० वाजता होमहवन, सूर्यप्रभा वाहन सेवा करण्यात आली. सकाळी ९ ते १२ या वेळेत होमहवन, चक्ररनानम् (चक्रतीर्थ), आराधना, शातुमुरै, तीर्थप्रसाद गोष्टी हे विधी करण्यात आले. सायंकाळी ५ ते ९ या वेळेत आराधना, चंद्रप्रभा वाहनसेवा, होमहवन, महापुर्णाहूती देवतोउद्वासनम्, श्री पुष्पयागम्, द्वादशाराधना, वसंतोत्सवम् (वनविहार) आदी विधी पार पडले. त्यानंतर ध्वजपट अवरोहणम् करण्यात आले. शातुमुरै, कुंभप्रोक्षणम, तीर्थप्रसाद गोष्टी आदी कार्यक्रम होऊन ब्रह्मोत्सवाचा समारोप करण्यात आला.
तिरुमलाहून आलेल्या पुरोहितवृंदाकडून मंत्रोच्चारात हे विधी करण्यात आले. ब्रह्मोत्सवाचा समारोप असल्यामुळे भक्तगणांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष रायलिंग आडम, विश्वस्त राजेशम येमुल, व्यंकटेश चिलका, जयेंद्र द्यावनपल्ली, लक्ष्मीनारायण कमटम, गोविंद बुरा, श्रीनिवास गाली, राजीव जक्कन, श्रीनिवास बोद्धूल आदी उपस्थित होते.
चक्रस्नानाने नकारात्मक शक्ती दूर होते
ब्रस्त्रोत्सवातील चक्ररनान हा एक महत्त्वाचा विधी आहे जो उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सकाळी केला जातो. या विधीमध्ये भगवान व्यंकटेश्वर, त्यांच्या पत्नी आणि सुदर्शन चक्र यांच्यावर अभिषेक केला जातो. हा अभिषेक तेल, हळद आणि इतर शुभ सामग्रीने केला जातो. हे स्नान नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी केले जाते. स्नान झाल्यानंतर संध्याकाळी ध्वज उतरवून ब्रह्मोत्सवाचा समारोप होतो.
सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवेचे महत्त्व
ब्रह्मोत्सव दरम्यान सूर्यप्रभा आणि चंद्रप्रभा वाहन सेवा ही दोन महत्त्वाची वाहने आहेत, जी उत्सवाचा भाग आहेत. सूर्यप्रभा वाहन हे सूर्यदेवाच्या रूपात प्रवास करताना दिसते, जे शक्ती आणि तेजाचे प्रतीक आहे. दुसरीकडे, चंद्रप्रभा वाहन हे शांती आणि शांतीचे प्रतीक आहे आणि ही सेवा संध्याकाळी आयोजित केली जाते. सूर्यप्रभा वाहन ही सेवा भगवान विष्णूच्या सूर्यरूपाचे प्रतिनिधित्व करते, कारण पुरुष सूक्त सूर्याचे वर्णन भगवानांच्या डोळ्यांतून झाल्याचे करते. या वाहनावर स्वार होऊन, भगवान भक्तांना सूर्याच्या किरणांप्रमाणे तेज आणि वैभवाचा अनुभव देतात. चंद्रप्रभा वाहनावर स्वार होऊन, भगवानांचे चंद्रासारखे, शीतल आणि प्रसन्न रूप पाहण्याची संधी मिळते, ज्यामुळे मनाला शांती मिळते. या सेवेद्वारे भगवान आपल्या भक्तांना चंद्रासारखे शीतलता आणि कल्याण प्रदान करतात.