पावसाच्या शिडकाव्याने विक्रेत्यांची तारांबळ
शहरासह उपनगरात गडगडाटासह पाऊस : विजेचा खेळखंडोबा
बेळगाव : दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास शहर परिसरात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. लक्ष्मीपूजनाची धामधूम सुरू असतानाच 15 ते 20 मिनिटे पाऊस झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच बाजारपेठेत रस्त्यावर खरेदीसाठी मांडलेल्या साहित्याची पळवापळव करावी लागली.
विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत पुन्हा हजेरी लावली आहे. सोमवारी रात्री 8 नंतर जोरदार पाऊस झाला. बेळगाव शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. मंगळवारी सकाळपासून कडक ऊन पडले होते. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते.
सायंकाळी 4 नंतर पावसाचा शिडकावा सुरू झाला. खरेदीसाठी मारुती गल्ली, गणपत गल्ली या मुख्य बाजारपेठांसह इतर परिसरात गर्दी होती. परंतु अचानक पाऊस दाखल झाल्याने साहित्य झाकून ठेवावे लागले. रस्त्यावर पणत्या, रांगोळ्या, हार, तसेच इतर साहित्य विक्री करणाऱ्यांची तारांबळ उडाली. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.
लक्ष्मीपूजनावेळीच वीज ठप्प
ऐन दिवाळीमध्ये वीजपुरवठा ठप्प झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा बंद झाला. खरेदीसाठी नागरिक दुकानांमध्येच असताना वीज गुल झाल्याने विक्रेत्यांची तारांबळ उडाली. काहींनी जनरेटरवर व्यवसाय सुरू केला. परंतु लक्ष्मीपूजनावेळीच वीज ठप्प झाल्याने धावपळ करावी लागली.