For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फेरीवाल्यांसाठी शहरात तीन ठिकाणी वेंडिंग झोन

11:06 AM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
फेरीवाल्यांसाठी शहरात तीन ठिकाणी वेंडिंग झोन
Advertisement

शहर-उपनगरातील पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

Advertisement

बेळगाव : पादचाऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या शहर व उपनगरातील पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून पदपथाऐवजी रस्त्यांवरून चालत जाण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट सिटी योजनेतून निर्माण करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकलाही अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. मात्र याकडे महापालिकेने व पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. फेरीवाल्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी शहरात तीन ठिकाणी वेंडिंग झोन निर्माण केले जाणार आहेत. शहरातील सर्वात रहदारीचा रस्ता असलेल्या कॉलेज रोडवर पदपथावर अतिक्रमण झाले आहे. राणी चन्नम्मा सर्कल ते कृष्ण देवराय सर्कलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेला पदपथच अतिक्रमणामुळे गायब झाला आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यापारी आस्थापने असल्याने त्याठिकाणी येणारे ग्राहक पदपथावरच आपली वाहने पार्क करत आहेत. महापालिकेकडून बांधकाम परवाना देताना तळघरात पार्किंगसाठी जागा सोडणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. मात्र बहुतांश जणांनी तळघरात देखील दुकाने थाटली आहेत. त्यामुळे संबंधितांची वाहने रस्त्यावर किंवा पदपथावर पार्क केली जात आहेत. अजमनगरकडे जाणाऱ्या मार्गावर फळांची दुकाने, स्टॉल्स, त्याचबरोबर गॅरेजनी पदपथ गिळंकृत केले आहेत. दुसरीकडे उद्यमबाग केळकरबाग, पंजुर्ली हॉटेल रोड, काँग्रेस रोड व इतर ठिकाणी फळ विक्रेते, नारळ विक्रेते, उसाचे पेय आणि शीतपेय विकणाऱ्या स्टॉल्स चालकांनी पदपथावर आपले व्यवसाय थाटले आहेत.

Advertisement

खासबाग, किल्ला तलाव, कणबर्गी येथे स्मार्ट सिटी योजनेतून कोट्यावधी रुपये खर्च करून तीन ते चार वर्षात बांधलेले व्यापार संकुल नागरिकांच्या वापरासाठी उघडता आली नाहीत. सदर दुकाने दोन महिन्यापूर्वी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. लवकरच खासबाग हॉकर्स झोनमधील 144 गाळे आणि किल्ला तलाव, कणबर्गी येथील एकूण आठ गाळे व्यापाऱ्यांच्या व्यापारासाठी दिली जाणार आहेत. यासाठी लवकरच निविदा देखील मागविली जाणार आहे. फेरीवाल्यांसाठी शहरात तीन ठिकाणी वेंडींग झोन तयार करण्याचा प्रस्ताव आहे. वेंडींग झोन तयार झाल्यास शहरातील पदपथ व सायकल ट्रॅकवरील अतिक्रमण कमी होईल

तर अतिक्रमण समस्या सुटेल

तीन ठिकाणी वेंडिंग झोन निर्माण करणार शहरातील फेरीवाल्यांसाठी तीन ठिकाणी वेंडिंग झोन निर्माण करण्याची योजना आखली आहे. वेंडिंग झोन तयार झाल्यास पदपथावरील अतिक्रमणाची समस्या सुटेल. अतिक्रमित पदपथ मोकळे करण्यासाठी पावले उचलू.

- शुभा बी., मनपा आयुक्त.

Advertisement
Tags :

.