For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेलिंगकर यांनी तपासाला सहाय्य करावे

01:11 PM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेलिंगकर यांनी तपासाला सहाय्य करावे
Advertisement

पोलिसांनी अर्नेशकुमार आदेशाचे अनुकरण करावे : उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश

Advertisement

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा प्रमुख आणि हिंदू रक्षा महाआघाडीचे गोवा राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर हे जर आपल्या वक्तव्याशी आजही सहमत असतील तर त्यांनी पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसा न चुकवता डिचोली पोलिसांसमोर हजर राहून तपासकामात सहकार्य करावे. तसेच वेलिंगकर यांना अटक करण्याची गरज पोलिसांना भासल्यास सर्वोच्च न्यायालयातील अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यातील निर्देशांचे पालन करण्याचा आदेश उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. बॉस्को रॉबर्ट यांनी वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना दिला आहे.

वेलिंगकर यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ख्रिस्ती लोकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी रात्री उशिरा फेटाळण्यात आला होता. उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. बॉस्को रॉबर्ट यांनी वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना दिलेले निकालपत्र मात्र मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आले. या निकालात ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा, माजी मंत्री चर्चिल आलेमाव, वोरेन आलेमाव आणि झिना परेरा या चार जणांच्या हस्तक्षेप याचिका व त्यावरील त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद जाणून घेतला आहे.

Advertisement

 कायदा व सुव्यवस्थेचा प्रसंग निर्माण झाला

आपल्या निकालपत्रात न्या. रॉबर्ट म्हणाले, की वेलिंगकर हे इतिहासतज्ञ, शिक्षक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि गोवा सुरक्षा मंच या राजकीय पक्षाचे सदस्य असल्याने जबाबदार नागरिक आहेत. त्यांना जरी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले तरी ते विधान केल्यानंतरच्या परिणामांची जाणीव ठेवून त्यांनी संयमाने वागणे जऊरी होते. त्यांच्या विधानामुळे अनेक गोमंतकीयांच्या भावना दुखावल्या गेल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रसंग निर्माण झाला.

 एफआयआर नोंदविण्याची आवश्यकता 

ऐकिव माहितीवर आधारून वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डीएनए चाचणीची मागणीऊपी द्वेषयुक्त विधान केवळ जातीय तणाव निर्माण करण्याच्या हेतूने केले आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या कलम-299 खाली वेलिंगकर यांच्यावर एफआयआर नोंदवण्याची पोलिसांना आवश्यकता भासली आहे.

 पोलिसांसमोर हजर राहून सहकार्य करावे

वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन दिला तर ते आपली कृती पुन्हा करण्याचा धोका आहे. वेलिंगकर हे जर आपल्या वक्तव्याशी आजही सहमत असतील तर त्यांनी पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसा न चुकवता डिचोली पोलिसांसमोर हजर राहून तपासकामात सहकार्य करावे, असेही म्हटले आहे. वेलिंगकर यांना अटक करण्याची गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयातील अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यातील निर्देशांचे पालन करण्याचा आदेश न्या. रॉबर्ट यांनी दिला आहे.

आपल्या मागणीचा वेगळा अर्थ काढून धार्मिक कलह माजविण्याचा प्रयत्न : वेलिंगकर

प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आपण केलेल्या विधानाशी ठाम असून ते याआधीही मांडले असल्याचे आपल्या बचावात म्हटले आहे. आपण कोणताही गुन्हा केलेला नसून कायद्याच्या आणि भारतीय संविधानाच्या परिघात राहूनच मागणी केलेली आहे. पोलिसांना तपासकामात सहकार्य करण्याची आपली पूर्ण तयारी असली तरी त्यासाठी पोलीस कोठडीत राहण्याची आवश्यकता नसल्याचे ठासून सांगितले आहे. याविषयी श्रीलंकन पत्रकार डब्लू जे. कविरत्ने यांनी लिहिलेल्या ‘षड्यांत्र सिद्धांत’ या अहवालाचा दाखला देताना सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव म्हणजे 15 व्या शतकातील बौद्ध साधू वेन थोतागणवे श्री राहुल थेरो यांचे असल्याने त्या शवाची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली होती. हिंदू समाजाविऊद्ध द्वेष व्यक्त करण्यासाठी या आपल्या मागणीचा वेगळा अर्थ काढून धार्मिक कलह माजवण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.