महामार्गावर जीव धोक्यात घालून धावताहेत वाहने
सोनी / गिरीश नलवडे :
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा तानंग फाटा ते बोरगाव टोलनाका दरम्यान अपघात झाले आहेत. अगदी दोनशे मीटरचा वळसा वाचविण्यासाठीसुद्धा वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करीत आहेत. परंतु, यामुळे येथून प्रवास करणे स्थानिकांना जिकरीचे वाटू लागले आहे. विरुद्ध दिशेने ये-जा करणान्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तानंग फाटा, कळंबी फाटा सिद्धेवाडी फाटा सोनी फाटा भोसे फाटा, यल्लामा मंदिर भोसे खरसिंग फाटा, अलकूड एम या गावात उड्डाणपुलापासून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. उड्डाणपूलाकडून वळसा घालून येण्यासाठी अवघे २०० ते ३०० मीटरचे मीटरचे अंतर कापावे लागते, मात्र, असा वळसा न घालता दुचाकीसह अन्य वाहने थेट विरुद्ध दिशेने जातात. यामुळे महामार्गावरील वाहनांना अडथळा निर्माण होतो, तसेच अपघातही होतात. काही लोकांना जीव गमवावा लागत आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वी २४ मार्च भोसे येथील यल्लमा मंदिराजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबीने ४३ वर्षीय दुचाकीस्वारला जोरदार धडक दिली. सदरच्या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर २३ मार्च महामार्गावर कळंबी येथे पंजाब हॉटेलजवळ कंटेनरची दुचाकीला धडक बसून पाच वर्षाचा बालक जागीच ठार झाला. त्यामुळे विरूध्द दिशने जाणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.