दंड ठोठावल्याने वाहनमालकाची उच्च न्यायालयात धाव
ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह तपासणी मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : राज्य सरकारला नोटीस
बेंगळूर : एका कार मालकाने ‘ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह’ तपासणी मशीनच्या त्रुटींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आपण मद्यपान केलेले नसताना देखील ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह मशीनमधील त्रुटींमुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयात अजयकुमार कश्यप यांनी यासंबंधी रिट याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी, वाहतूक पोलिसांनी आपल्याला अडविले. ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह मशीनने तपासणी केली. दोन वेळा निगेटिव्ह आढळलो, पण तिसऱ्या वेळेस पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.
मी मद्यप्राशन केलेले नाही, असे सांगून सुद्धा पोलिसांनी ते मान्य केले नाही. पोलिसांनी कार जप्त करून 10,000 रुपये दंड ठोठावला. मी खासगी प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला. ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह तपासणी मशीनमध्येच दोष आहे, असा उल्लेख केला आहे. न्यायमूर्ती बी. एम. श्यामप्रसाद यांच्या नेतृत्वातील उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने राज्य सरकारला सवाल उपस्थित केला आहे. मशीनमध्येच बिघाड असताना मद्यपान करून वाहन चालविल्याचा आरोप मान्य करता येणार नाही, असे म्हटले आहे. या मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल सरकारने उत्तर द्यावे, अशी सूचना देत राज्य सरकार आणि वाहतूक पोलिसांना नोटीस बजावली आहे.