सुळगा (हिं.) बसस्थानकाशेजारीच भाजीविक्रेत्यांचे ठाण
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-बाची या मार्गावरील सुळगा(हिं.) येथील बसस्थानकाशेजारीच रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांनी चक्क झोपड्याच उभ्या करून यामध्ये भाजीविक्रीस प्रारंभ केल्याने ग्राहक रस्त्यावर थांबूनच भाजी विकत घेत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झोपड्या उभ्या केल्याने अधिकच वाहतुकीची कोंडी होत आहे. यासाठी तातडीने यावर संबंधितांनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी, नागरिकांतून करण्यात येत आहे. सदर ठिकाण म्हणजे आता वाहतुकीला अडथळा आणि अपघाताचा सापळा बनला आहे. जर सदर ठिकाणी मोठा अपघात घडला तर याला जबाबदार कोण? ग्रामपंचायत की सार्वजनिक बांधकाम खाते, असा प्रश्न येथील ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गातून केला जात आहे. येथील अनेक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार सुळगा(हिं.)बसस्थानकाशेजारी रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांनी अनेक झोपड्या उभ्या केल्या आहेत. यामध्ये भाजीविक्री केली जाते.
रात्रीच्या अंधारात देखील दिवे लावून भाजीविक्री सुरू असते. या मार्गावरून ये-जा करणारे अनेक प्रवासी रस्त्यावर थांबूनच आता दोन्ही बाजूला भाजी घेत असल्याने दोन्ही बाजूला वाहने पार्क केल्याचे चित्र दिसून येत आहे. सायंकाळच्या वेळी भाजी विकत घेण्याची गर्दी अधिक असते. याबरोबरच रस्त्यावरून वाहतुकीचीही अधिक कोंडी या ठिकाणी याचवेळी होत आहे. परिणामी अपघाताचे प्रकार या ठिकाणी घडत असतात. सदर रस्ता हा बेळगाव-वेंगुर्ले महामार्ग असल्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असते. परिणामी एखादेवेळी वाहन या गर्दीमध्ये शिरले तर फार मोठा धोका निर्माण होण्याचा संभव असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सुळगा ग्रामपंचायतने याची तातडीने दखल घेऊन सदर झोपड्या हटवाव्यात आणि भाजीविक्रेत्यांचा एक वेगळा कक्ष, वेगळ्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी होत आहे.