रणगाड्यावरच थाटले भाजीचे दुकान
सीरियातील एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले आहे. सीरियात एका युद्ध रणगाड्यावरच भाजी विक्रीचे दुकान थाटले गेले आहे. हा प्रकार सीरियाची राजधानी दमास्कस येथील असून तेथे एका स्थानिक दुकानदाराने सोव्हियत काळातील टी-55 रणगाड्यालाच भाजीविक्रीच्या दुकानात बदलून टाकले आहे. या रणगाड्याचा वापर कधीकाळी सीरियाचे माजी अध्यक्ष बसर अल असाद यांच्या सैन्याने केला होता. याचमुळे हे छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
रस्त्याच्या कडेला एक रणगाडा उभा असल्याचे आणि त्याच्यासमोर विविध भाज्या मांडण्यात आल्याचे या छायाचित्रात दिसून येते. दुकानदाराने स्वत:च्या भाज्यांची मांडणी रणगाड्यांवर करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. हा रणगाडा असाद यांच्या सैन्याच्या शक्तीचा प्रतीक होता. परंतु आता तो भाज्या आणि अन्य सामग्री विकणाऱ्या दुकानदारांसाठी एक साधन ठरला आहे.
या छायाचित्राला 50 हजारांहून अधिक ह्यूज आणि शेकडो लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. रणगाड्याचा हा योग्य वापर असल्याची टिप्पणी एका युजरने केली आहे. तर अन्य युजरने जर भाज्यांचे पैसे दिले नाही तर काय होईल, याचा विचार करा अशी मजेशीर टिप्पणी केली आहे.