रशियाचे युक्रेनवर 700 हवाई हल्ले
ऊर्जा केंद्रांसह रेल्वे पायाभूत सुविधांचे नुकसान
वृत्तसंस्था/ कीव, मॉस्को
रशियाने युक्रेनमध्ये सशस्त्र सेना दिनापूर्वी शनिवारी रात्री उशिरा मोठा हवाई हल्ला केला. युक्रेनियन हवाई दलाच्या दाव्यानुसार, रशियाने 29 लक्ष्यांवर 653 ड्रोन आणि 51 क्षेपणास्त्रs डागली. यापैकी 585 ड्रोन आणि 30 क्षेपणास्त्रs पाडण्यात आली. या हल्ल्यामध्ये आठ जण जखमी झाले. तसेच या हवाई हल्ल्यांमध्ये अनेक ऊर्जा केंद्रे आणि रेल्वे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प तात्पुरता बंद करण्यात आला होता. मात्र, रिअॅक्टर बंद पडल्याने कोणताही मोठा धोका निर्माण झाला नाही.
युक्रेनवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात रशियाने चुकून स्वत:च्याच भागातील बेल्गोरोड शहरावर (युक्रेनियन सीमेपासून सुमारे 40 किमी अंतरावर) एफएबी-1000 (उच्च-स्फोटक बॉम्ब) टाकला. बॉम्बचे वजन अंदाजे 1,000 किलो होते. बॉम्ब पूर्णपणे फुटला नाही, परंतु त्यामुळे जमिनीवर एक मोठा ख•ा निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षाला रशियाकडून पुष्टी मिळाली आहे. रशियाने 116 युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावाही केला. दुसरीकडे, युक्रेनने रशियाच्या रियाझान तेल शुद्धीकरण कारखान्यावरही लांब पल्ल्याच्या ड्रोनने हल्ला केला. युक्रेनच्या लष्कराने आणि रशियन प्रादेशिक अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली. गेल्या काही महिन्यांपासून, युक्रेन रशियाचा तेल निर्यात महसूल कमी करण्यासाठी रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांवर सतत हल्ला करत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थोपविण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, युक्रेनियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांमधील तीन दिवसांची चर्चा अयशस्वी झाल्याचे समजते. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे शांततादूत स्टीव्ह विटकॉफ आणि अमेरिकेच्या अध्यक्षांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, युरोपियन नेते सोमवारी लंडनमध्ये भेटण्याची तयारी करत आहेत. यापूर्वी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या हेतूंबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका युक्रेनचा विश्वासघात करू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
ऊर्जा केंद्र लक्ष्यस्थानी : झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही हल्ल्याबाबतची माहिती दिली. रशियाच्या हल्ल्यांमध्ये पॉवर स्टेशन आणि ग्रिडशी जोडलेल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले. हल्ल्यांमुळे अनेक भागात ब्लॅकआउट झाले. फास्टिव्ह (कीवजवळ) येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यात एक रेल्वे स्टेशन पूर्णपणे नष्ट झाले. झापोरिझिया प्लांट रात्रभर काही काळासाठी बाह्य वीजेपासून खंडित झाला होता, असे युक्रेनच्या प्रशासनाने म्हटले आहे.